आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली. राज्यातील शेतकऱ्यांची तब्बल ४८ हजार कोटी रुपयांची थकीत वीज बिलं पूर्णपणे माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
शेतकऱ्यांची पाटी पूर्णपणे कोरी झाली पाहिजे आणि त्याच कोऱ्या पाटीवर आपल्याला महाराष्ट्राचा नवा इतिहास लिहिता आला पाहिजे, याच एका ध्येयाने आम्ही हा धाडसी निर्णय घेतला आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतल्याबद्दल भाजपच्या प्रदेश समितीच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, कर्जमाफी आणि थकीत बिलांच्या मुद्द्यावर मी नेहमीच राज्याच्या आर्थिक शिस्तीबद्दल स्पष्टपणे बोललो आहे. मात्र, आमच्या महायुतीतील काही सहकारी मंडळींनी जेव्हा माझ्याशी यावर सविस्तर चर्चा केली, तेव्हा आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “जर आम्हाला केवळ आणि केवळ राजकारणच करायचे असते, तर २०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या शेवटी आम्ही कर्जमाफीचा विचार केला असता. परंतु, आम्ही शेतकऱ्यांच्या हिताच्या आड कधीही राजकारण आणणार नाही. राजकारण आम्ही करूच, ते तर करावंच लागेल; पण बळीराजाच्या जीवावर करणार नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
“अनेकांना वाटत होतं त्यांचं दुकान चालू राहील, पण…”
विरोधकांवर थेट हल्ला करताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, “अनेक विरोधकांना वाटत होतं की शेतकऱ्यांच्या थकीत बिलांच्या आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर त्यांचं राजकीय दुकान नेहमीच चालू राहील. पण ते बहुधा विसरले की, हे ‘देवाभाऊंचं’ सरकार आहे! आम्ही जे बोलतो, ते करून दाखवतो,” असा घणाघात त्यांनी केला.
