INDIA alliance news : भाजपचे मनसुबे उधळले? इंडिया आघाडी एकजुटच; 21 नव्हे 23 पक्षांची थेट सरन्यायाधीशांकडे धाव

pune लोकसभा आणि राज्यसभेत दोन तृतियांश सदस्यांचा आकडा गाठण्यासाठी विरोधी पक्षात फूट पाडली जात असल्याचा आरोप सर्वच विरोधी पक्षांकडून केला जात आहे.

तर इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये एकजूट नसल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. आघाडीच्या ८ जून रोजी झालेल्या बैठकीकडे द्रमुकसह आम आदमी पक्षाने पाठ फिरविली होती. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते.

इंडिया आघाडीच्या २२ दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या बैठकीत २१ पक्षांचे नेते हजर होते. आता इंडिया आघाडीकडून मंगळवारी सरन्यायाधीश सूर्य कांत यांना विविध मुद्द्यांवर पत्र लिहिण्यात आले आहे. या पक्षावर २३ पक्षांच्या नेत्यांनी सह्या केल्या आहेत. बैठकीमध्ये गैरहजर असलेल्या आप आणि द्रमुकच्या नेत्यांनीही या पत्रावर सह्या केल्या आहेत.

आप आणि द्रमुकच्या नेत्यांच्या सह्यांमध्ये इंडिया आघाडी पुन्हा एकजुट झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पत्राबाबत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करत २३ पक्षांच्या नेत्यांसह एका अपक्ष खासदाराची सही असल्याचा उल्लेख केला आहे. त्यावर तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी द्रमुक आणि आपच्या नेत्यांनीही सही केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे एकप्रकारे इंडिया आघाडीत फूट पडल्याचा भाजपचा दावा फोल ठरला आहे.

दरम्यान, आप आणि द्रमुकने काँग्रेसच्या भूमिकेवर आक्षेप घेत बैठकीला जाणे टाळले होते. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने टीव्हीकेला पाठिंबा दिल्याने द्रमुकमध्ये प्रचंड नाराजी आहे. तर आपनेही याच मुद्यावर काँग्रेसशी नाते तोडल्याचे म्हटले होते. जिथे काँग्रेस असेल तिथे आपले नेते उपस्थित राहणार नाहीत, असे या पक्षांनी जाहीर केेले होते.