भोर, दि. २० जून २०२६ : पुणे ग्रँड टूर २०२७ योजनेअंतर्गत भोर, राजगड आणि मुळशी विधानसभा मतदारसंघातील १७ महत्त्वाच्या रस्त्यांच्या सुधारणा कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तब्बल १९७ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून सुमारे १३० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे आधुनिकीकरण व मजबुतीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार शंकर मांडेकर यांनी दिली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
मुळशी तालुक्यातील ६, राजगड तालुक्यातील ५ आणि भोर तालुक्यातील ६ अशा एकूण १७ रस्त्यांच्या कामांचा यात समावेश असून, घोटावडे फाटा–मुठा, मुठा–कोंढुर, टायगर पॉइंट–आंबवणे, कोंढुर फाटा–जांभळी, आहेरवाडी–निवे, मार्गासणी–पाबे फाटा, पाबे फाटा–वेल्हे, पाल खिंड–खरीव, जांभळी–पानशेत तसेच माळवाडी–जोगवडी ते खुलशी–पाल खिंड या महत्त्वाच्या मार्गांच्या सुधारणा करण्यात येणार आहेत.
या सर्व कामांची निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे मतदारसंघातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित व गतिमान होणार असून पर्यटन विकासालाही मोठी चालना मिळणार आहे.
याशिवाय पीएमआरडीए आणि जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत पानशेत–मोसे–मुगाव, मुगाव–ताम्हिणी आणि आंबवणे–बार्पे–आहेरवाडी या मार्गांच्या कामांसाठीही निधी मंजुरीच्या प्रक्रियेत असल्याचे आमदार मांडेकर यांनी सांगितले.
पुणे ग्रँड टूर २०२७ अंतर्गत मतदारसंघातील रस्ते विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, विभागीय आयुक्त शितल तेली-उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांचे आमदार शंकर मांडेकर यांनी आभार मानले.
