Pune पुणे महापालिकेत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांना चाप लावण्यासाठी पालिका प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तांत्रिक निर्णय घेतला आहे.
यापुढे महापालिकेच्या कायमस्वरूपी तसेच कंत्राटी तत्त्वावरील नोकरभरतीच्या प्रत्येक आदेशावर ‘क्यूआर’ कोड छापण्यात येणार आहे. येत्या ५ जूनपासून या नव्या प्रणालीची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांनी दिली.
नागरिकांनी कोणत्याही नियुक्तीपत्रावर आंधळेपणाने विश्वास न ठेवता, महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन त्या आदेशाची खातरजमा करावी, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सध्याच्या डिजिटल युगात एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. महापालिकेचे अधिकृत बोधचिन्ह (लोगो), वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या आणि हुबेहुब दिसणारी नियुक्तीपत्रे तयार करून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
महापालिकेच्या कोणत्याही नोकरभरती प्रक्रियेतील आदेश अथवा कागदपत्रांची सत्यता तपासण्यासाठी आता ‘क्यूआर’ कोडची मदत होईल. नागरिकांनी हा कोड स्कॅन करून पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरच पत्राची खातरजमा करावी आणि फसवणूक टाळावी.”
– प्रजीत नायर, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका
याबाबत बोलताना अतिरिक्त आयुक्त नायर यांनी सांगितले की, “काही बनावट आदेश इतक्या हुबेहुब पद्धतीने तयार केलेले असतात की, ते खरे आहेत की खोटे हे ओळखण्यासाठी पालिकेच्या यंत्रणेलाही वेळ लागतो.” या वाढत्या फसवणुकीला पायबंद घालण्यासाठीच आता प्रत्येक भरती प्रक्रियेतील प्रस्तावाची फाईल सुरुवातीपासून ट्रॅक करण्याची व्यवस्था केली जात असून, अंतिम आदेशावर क्यूआर कोड दिला जाणार आहे. हा कोड स्कॅन करताच संबंधित उमेदवाराच्या आदेशाची मूळ प्रत थेट महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर उघडेल, ज्यामुळे बनावट पत्रांचे पितळ लगेच उघडे पडेल.
महापालिकेत सध्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. याचाच गैरफायदा घेत प्रामुख्याने चतुर्थ श्रेणीतील नोकऱ्यांचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांना जाळ्यात ओढले जात आहे. बेरोजगारीच्या विळख्यात अडकलेले अनेक तरुण या भामट्यांच्या भूलथापांना बळी पडत असून, त्यांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे.
दोन वर्षांपूर्वी नोकरीच्या आमिषाने झालेल्या फसवणुकीमुळे एका तरुणाने नैराश्यात आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी महापालिकेकडे माहिती मागवली होती. त्यावेळी २०१४ पासून सरळसेवा भरती बंद असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले होते. तसेच, तरुणाला मिळालेले नियुक्तीपत्र बनावट असल्याचेही उघड झाले. दरम्यान, मृत तरुणाच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून १३ संशयितांची नावे समोर आली आहेत. यामध्ये महापालिकेचा कोणता कर्मचारी सहभागी आहे का, याची चौकशी सुरू असून, तसे आढळल्यास माहिती पोलिसांना दिली जाईल, असे नायर यांनी सांगितले.
