Pune News पुणे महानगरपालिकेमध्ये सलग दुसऱ्यांदा एक हाती सत्ता देऊन भारतीय जनता पक्षाला पुणेकरांनी सत्ताधारी पक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. मात्र महापालिकेत सत्ता स्थापन केल्यापासून भाजपमध्ये अंतर्गत धूस्पूस सुरू आहे.
पदाधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आलेले नेते एकमेकांशी संवाद साधत नाहीत. आपणच पक्षाचे सर्वेसर्वा असल्याची भावना प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या मनात असून प्रत्येक जण स्वतंत्रपणे निर्णय घेत असल्याचे समोर आला आहे.
महापालिकेत पक्षातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत गटबाजीमुळे उलट सुलट चर्चा ऐकायला मिळत आहे. महापालिकेतील पदाधिकाऱ्यांमध्ये असलेल्या या गटबाजीची चर्चा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर गेली आहे. राज्याच्या पातळीवरून देखील महापालिकेत सुरू असलेल्या पक्षांतर्गत धूसफुशीची दखल घेण्यात आली असून पालिकेतील पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधनेच्या सूचना संबंधितांना करण्यात आले आहेत.
महापालिकेत भाजपचा नगरसेवकांमध्ये असलेले मतभेद दूर करण्यासाठी तसेच पदाधिकाऱ्यांना सूचना करण्यासाठी भाजपने नगरसेवक पदाधिकाऱ्यांसह शहर पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत कडक शब्दात सुनावण्यात आले. ‘पुणेकरांनी विकासकामे करण्यासाठी दुसऱ्यांदा महापालिकेत भारतीय जनता पक्षाला सत्ताधारी केले आहे. नागरिकांच्या विश्वासाला तडा जाईल, असे वागू नका. पुणेकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाने महापालिकेत पाठविले आहे. त्यामुळे आतला, बाहेरचा असा वाद करू नका,’ अशा शब्दांत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवकांना सुनावले.
भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील नगरसेवक, आमदार आणि पक्ष पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय वाढविण्यासाठी पक्षाकडून दोन दिवसांचे निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. नारायणपूरजवळ ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान’ घेतले जात आहे. त्यामध्ये मार्गदर्शन करताना भाजपच्या नेत्यांनी नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार योगेश टिळेकर, सुनील कर्जतकर, भारत आमदापुरे, रवींद्र साठे, समीर गुरव, महेश मानेकर यांनी या शिबिरात मार्गदर्शन केले. या वेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, सुनील कांबळे यांच्यासह भाजपचे नगरसेवक, मंडल अध्यक्ष, सरचिटणीस उपस्थित होते.
‘पुणेकरांनी विकासाची कामे मार्गी लागावीत, यासाठी भाजपला महापालिकेत सत्ताधारी म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. नागरिकांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच प्रत्येकाने गटतट बाजूला ठेवून पक्षवाढीवर भर दिला पाहिजे. पक्षाची ज्या भागात ताकद नाही. तिथे आपण अन्य पक्षातील लोकांना भाजपमध्ये घेतो. त्यामुळे आतले आणि बाहेरचा हा वाद करू नका. जे आहे ते स्वीकारले पाहिजे. राष्ट्र हिताबरोबर पक्षाच्या विचारधारेला प्राधान्य द्या,’ अशा शब्दांत उपस्थितांना सांगण्यात आले. या शिबिराची आज मंगळवारी सांगता होणार आहे.
