Pune News काँग्रेस नेते डॉक्टर केतन भाटीकर यांचं निधन झालं आहे. सर्पदंश झाल्यामुळे केतन भाटीकर यांचं निधन झाल्याची माहिती देण्यात आली आहे. केतन भाटीकर यांनी अलीकडेच फोंडा पोटनिवडणूक काँग्रेसकडून लढवली होती.
त्यांच्या अकाली निधनामुळे गोव्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे नेते भाटीकर हे फोंडा मतदारसंघामध्ये लोकप्रिय नेते होते. अलीकडेच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काही कामाच्या निमित्ताने ते अनमोड घाटातून प्रवास करत होते. त्यावेळी ते एका ठिकाणी थांबले होते. त्यावेळी सापाने त्यांना दंश केला. पहाटे त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून धारबांदोडा येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं. पण, उपचार सुरू होण्याआधीच त्यांचं निधन झालं होतं. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.
पायावर आढळल्या खुणा
केतन भाटीकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पण भाटीकर याांच्या पायावर जखमेच्या खुणा आढळून आल्या आहे, त्यामुळे संर्पदंशामुळे मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. पण, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर कारण स्पष्ट होईल, असं डॉक्टरांन सांगितलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात दाखल झाले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश
केतन भाटीकर हे फोंडा परिसरात लोकप्रिय नेते होते. त्यांनी अलीकडे भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. फोंडा मतदारसंघामध्ये रवी नाईक यांच्य निधनामुळे इथं पोटनिवडणूक होत होती. या ठिकाणी भाजपने नाईक यांच्या मुलाला तिकीट दिलं होतं. त्यामुळे नाराज झालेले भाटीकर हे काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. मात्र, या निवडणुकीचा वाद हा कोर्टात पोहोचला. हायकोर्टाच्या निर्णयामुळे ही निवडणूक रद्द करण्यात आली होती. भाटीकर यांनी या हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सध्या हे प्रकरण प्रलंबित आहे. अशातच भाटीकर यांच्या निधनामुळे आता फोंडा परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे डॉ.केतन भाटीकर
दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्वीट करून भाटीकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं. “प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉ. केतन भाटीकर यांच्या अकाली निधनाची बातमी ऐकून तीव्र धक्का बसला आणि अत्यंत दुःख झाले. त्यांचे जाणे हे वैद्यकीय क्षेत्राचे कधीही भरून न येणारे मोठे नुकसान आहे. या अत्यंत कठीण काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांच्या आणि मित्रांच्या पाठीशी आहेत ,असं म्हणत प्रमोद सावंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
