पुणे प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने नुकतीच विविध मंडलांमध्ये प्रभारी पदांवर वरिष्ठ व अनुभवी कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत धायरी-शिवणे मंडल प्रभारीपदी भाजपचे सक्रिय कार्यकर्ते गणेश कळमकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर धायरी-शिवणे मंडलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत मंडलातील पदाधिकारी, बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी संघटनात्मक नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना गणेश कळमकर म्हणाले की, “सध्या कोणत्याही निवडणुका तातडीने नसल्यामुळे हा कालावधी संघटन अधिक मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणारे लोकहिताचे आणि जनकल्याणकारी निर्णय समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे, हेच आपले प्रमुख उद्दिष्ट आहे.”
तसेच बैठकीत SIR उपक्रम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे व्यापक जनजागरण तसेच पदवीधर मतदार नोंदणी अभियानाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बूथ स्तरावरील कार्य अधिक प्रभावी करण्यासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन व नियोजन करण्यात आले.
या बैठकीस मंडल अध्यक्ष विजयजी मते, नगरसेविका सौ. धनश्रीताई कोल्हे, महिला मोर्चा मंडलाध्यक्ष मनीषाताई मोरे, पुणे शहर महिला मोर्चा सरचिटणीस रोहिणी राहणे, ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव दत्ताभाऊ कोल्हे, पुणे शहर उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा रमेशभाऊ गायकवाड, अनुसूचित जाती मोर्चा उपाध्यक्ष प्रकाशभाऊ साळवे, नरसिंहभाऊ लगड, अनिलभाऊ पोकळे, किरणभाऊ हगवणे, भगवानभाऊ मोरे तसेच बूथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
