ओढ्यात अतिक्रमण करू दे, अन्यथा जीव घेऊ; बिल्डरकडून शेतकऱ्याला धमकी

पौड प्रतिनिधी : पौड येथील गाव ओढ्यात अतिक्रमण करून भिंत बांधण्यास विरोध केल्याने प्लॉटिंग व्यावसायिकांकडून शेतकऱ्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पौड पोलिसांनी चौघांसह तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

याबाबत सुरेश कान्हू ढोरे (वय ६६, रा. मोरया बिल्डिंग, पौड, ता. मुळशी) यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेंद्र रसाळ, सागर भिलारे, विलास पिंगळे यांचा जावई, हरीश चव्हाण आणि तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन सलगर, महेश पवार, दीपक पालके व संतोष डावलकर यांनी आरोपी राजेंद्र बाळू रसाळ (वय ४०, रा. विठ्ठलवाडी, पौड) याला अटक केली आहे.

फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या शेतालगत असलेल्या नैसर्गिक ओढ्याच्या प्रवाहात भिंत बांधून अतिक्रमणाचे काम सुरू करण्यात आले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या मुलांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर काम थांबविण्यात आले. याच कारणावरून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मुलांना धमक्या दिल्या.

३ मार्च रोजी फिर्यादींचे मुलगे सागर आणि रितेश ढोरे शेतात गेले असता काही महिला आणि एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना दिसले. त्यानंतर आरोपींकडून सतत धमकावण्याचे प्रकार सुरू झाले.

१३ मार्च रोजी सकाळी फिर्यादी शेतात गेले असता एक व्यक्ती त्यांच्या शेतात घुसून त्यांनी लावलेल्या बोर्डजवळ खड्डे खोदताना आढळला. त्याने “तुला याच खड्ड्यात गाडून टाकतो” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

यानंतर रिक्षातून काही महिला व एक रिक्षाचालक यांनी फिर्यादींचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. फिर्यादी घरी पोहोचल्यानंतर संबंधित व्यक्तींनी त्यांच्या घरासमोर येऊन शटर उघडून आत डोकावत ठार मारण्याच्या धमक्या दिल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळल्याचे सांगण्यात आले.

तसेच “ओढ्याच्या नैसर्गिक प्रवाहात भिंत बांधू द्या, अन्यथा परिणाम भोगावे लागतील” अशी धमकी आरोपींकडून देण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी फिर्यादी यांनी घटनास्थळाचे फोटो, बांधकामाचे पुरावे, तहसीलदार कार्यालयातील नोंदी तसेच सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे सादर केले आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सचिन सलगर करीत आहेत.