Pune update पुणे महापालिकेतील ‘टक्केवारी’च्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला असून, यावेळी वाद थेट सत्ताधारी भाजपच्या गोटातच पेटल्याचे पाहायला मिळाले. बाणेर येथील आदिवासी विद्यार्थिनींसाठी उभारण्यात येणाऱ्या निवासी शिक्षण केंद्राच्या कामावरून विद्यमान आणि माजी नगरसेविकांमध्ये महापालिकेतच जोरदार वादावादी, शिवीगाळ आणि गोंधळ उडाल्याची घटना बुधवारी घडली.
या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. महापालिकेमार्फत बाणेर येथे उभारण्यात येणाऱ्या या निवासी शिक्षण केंद्राचे सुमारे ८५ ते ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामासाठी तब्बल ३ कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले असून, त्याला स्थायी समितीची मंजुरीही मिळाली आहे.
मात्र, अंतिम टप्प्यातच ‘टक्केवारी’च्या मुद्द्यावरून वातावरण तापल्याचे समोर आले आहे. या प्रकल्पासाठी सुरुवातीपासून पाठपुरावा करणाऱ्या माजी नगरसेविका राजश्री काळे बुधवारी महापालिकेच्या भवन विभागात आल्या असता, तेथे विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे आणि संबंधित कंत्राटदार उपस्थित होते. यावेळी कामाच्या अंमलबजावणीवरून दोघींमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच वादाने उग्र रूप धारण केले आणि थेट शिवीगाळपर्यंत मजल गेल्याचे सांगितले जाते. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माजी नगरसेविका राजश्री काळे यांनी रोहिणी चिमटे यांच्यावर आरोप केला की, “हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून आदिवासी विद्यार्थिनींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
मात्र ‘टक्केवारी’च्या कारणावरून कामात अडथळा आणला जात आहे. नगरसेविका रोहिणी चिमटे यांनी कंत्राटदाराला टक्केवारी मिळेपर्यंत काम सुरू करू नका, अशी धमकी दिली. स्थायी समिती सदस्य असल्याचा धाक दाखवत काम रोखण्याचा प्रयत्न केला.” असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दुसरीकडे, नगरसेविका रोहिणी चिमटे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “केंद्राच्या सीमा भिंतीचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे शेजारील नागरिकांना त्रास होत आहे. ते काम आधी पूर्ण करण्यास सांगितले होते. त्यावरून गैरसमज झाला,” असे त्यांनी सांगितले आहे. या प्रकारामुळे महापालिकेतील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा उघड्यावर आले असून, ‘टक्केवारी’च्या आरोपांनी भाजपलाच घरचा आहेर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे
