Pune News अवकाळी पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार वर्षांत करण्यात आलेल्या पावसाळी लाईन (स्टॉर्म वॉटर ड्रेनेज) कामांचा सविस्तर अहवाल जाहीर करावा, अशी मागणी “आपले पुणे आपला परिसर” संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.
पुणे शहरात निर्माण झालेल्या परीिस्थतीच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात पावसाळी लाईनची कामे कितपत झाली, ती पूर्ण झाली की अर्धवट राहिली, याचा आढावा घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
गेल्या चार वर्षांत या कामांवर सुमारे दीडशे कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर येत असून, या खर्चाचा तपशील आणि कामांची ठिकाणनिहाय माहिती पुणे महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे प्रशासनालाही कामांचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करता येईल आणि आगामी पावसाळ्यासाठी योग्य नियोजन करता येईल, असे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी तसेच माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी संयुक्तपणे सांगितले.
आम आदमी पक्षाने प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी ” पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक असलेल्या पावसाळी लाईनची कामे न झाल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली. परिस्थितीची माहिती देऊनही पालिका आणि सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाने कोणतीही तातडीची दखल घेतली नाही. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा प्रभावी नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला,” असा आराेप केला. प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही धनंजय बेनकर यांनी दिला आहे.
पावसाच्या तडाख्यानंतर प्रशासनाला जाग
अवकाळी पावसाने शहराला जाेरदार तडाखा दिल्यानंतर प्रशासन जागे झाले आहे. साेमवारपासून नालेसफाईची कामे हाती घेतली जातील असे आयुक्त नवल किशाेर राम यांनी स्पष्ट केले. पावसाची तीव्रता लक्षात घेत स्थायी समितीची बैठक सुरु असतानाच आयुक्त नवल किशाेर राम यांनी खाते प्रमुखांना पाणी साठण्याच्या ठिकाणावर पाेहचून पाण्याचा निचरा करण्याच्या सुचना दिल्या हाेत्या. त्यामुळे कमीत कमी वेळेत कर्मचारी, अधिकारी ‘ऑन फिल्ड’ हाेते असा दावाही प्रशासनाने केला आहे. भारत सरकारच्या नियमानुसार पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता सध्याच्या उपलब्ध नैसर्गिक नाल्यात नाहीत. सध्या आपल्याकडे ५० ते ६० मिमी पाऊस पडल्यानंतर पाण्याचा निचरा हाेईल अशी गटार व्यवस्था आहे. मात्र, प्रत्यक्षात आपल्याकडे १३० मिमी पाऊस पडल्यानंतरही शहरात पाणी तुंबणार नाही अशी यंत्रणा उभी करावी लागणार आहे, असे आयुक्त नवल किशाेर राम यांनी नमूद केले.
