झेडपीचीं बिनविरोध होणारी निवडणूक; भाजपाने फिरवली; राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार
Pune News – : पुणे, दि. १८ मार्च २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात दोन्ही शिवसेना आणि भाजपने एकत्रित उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविला आहे. यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे गटनेते विजयसिंह शिंदे यांनी अध्यक्ष पदासाठी तर, शिवसेना (शिंदे गट) मंगेश काकडे यांनी उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भाजपाचे गटनेते शिवाजी बुचडे पाटील यांच्या समवेत दाखल केला.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्यासाठी भाजप आणि दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अध्यक्ष पदासाठी विरधवल जगदाळे आणि उपाध्यक्ष पदासाठी विवेक वळसे-पाटील हे उमेदवार दिले आहेत.
मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येला पुणे जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडले जाणार आहेत. या निवडीमुळे गेल्या मागील सुमारे ४ वर्षांपासून असलेली अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची प्रतिक्षा आता संपणार आहे. शिवाय प्रदीर्घ काळापासून जिल्हा परिषदेवर सुरू असलेलले प्रशासकराज संपुष्टात येणार आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेची पहिली विशेष सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.१८ मार्च) होणार आहे. या सभेतच साध्या बहुमताच्या आधारे जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडले जाणार आहेत. दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठीची विशेष सर्वसाधारण सभा सुरू होणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल
- राष्ट्रवादी काँग्रेस — ५१
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष — ०१
- भाजप — १०
- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) — ०६
- शिवसेना — ०५
- एकूण — ७३
- साध्या बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ — ३७
