आमदार मांडेकरांनी थोपटेंचा गेम पलटवला ! पंचायत समितीमध्ये अनोखा ‘मुळशी पॅटर्न

Pune news जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा सभापती निवडीच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. त्यामुळे राजकीय गणित जुळून आपल्या पक्षाचा सभापती कसा होईल यासाठी स्थानिक नेते फिल्डिंग लावताना पाहायला मिळत आहेत.

अशीच मुळशी पंचायत समितीसाठी एकीकडे भाजप नेते आणि माजी आमदार संग्राम थोपटे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर हे इतर पक्षातील सदस्यांना आपल्याकडे घेऊन नवी समीकरणे जुळवताना पाहायला मिळत आहेत.

मुळशी पंचायत समितीमध्ये सहा जागांपैकी तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस विजय झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन सदस्य निवडून आले आहेत. आणि भाजपाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहेत.

मुळशीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वाधिक जागा असल्या तरी त्यांना बहुमतासाठी एका सदस्याच्या पाठींबाची आवश्यकता आहे.अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन सदस्य आणि भाजपाचा एक अशी एकत्रित तीन सदस्यांची सांगड बांधून संग्राम थोपटे यांनी मांडेकरांना शह देण्यासाठी सत्तेची आखणी केली असल्याचे बोलले जात होते.

मात्र आता मांडेकरांनी पलटवार केला असून मुळशी पंचायत समिती वेगळा पॅटर्न आणला असल्याची चर्चा आहे. तालुका पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदासाठी ९ मार्च रोजी निवडणूक होत आहे.

उपसभापतीपदासाठी फिल्डिंग

मुळशी तालुक्यातील सभापतिपद हे महिलांसाठी राखीव असून, या ठिकाणी सर्व पक्षांमधून तीन महिला निवडून आले आहेत. तालुक्याचे आमदार शंकर मांडेकर यांनी अडीच वर्षांचा कार्यकाळ प्रत्येक महिलेला 10 महिने सभापतिपद असा ठरवून देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. तर, पुरुष तीन सदस्यांना याप्रमाणेच उपसभापतिपद, त्यामुळे सर्वच सदस्यांना पदे मिळतील. हा फार्म्युला जिल्ह्यात चर्चेचा झाला आहे.

‘मुळशी पॅटर्न’ची चर्चा

या फार्मूल्यामुळे शरद पवारांच्या पक्षातील सदस्यांना सोबत घेऊन गणितात आखणाऱ्या थोपटेंच्या प्लॅनिंगला कुठेतरी खिळ बसली असल्याचे बोलले जात आहे. तर मांडेकरांचा हा मुळशी पॅटर्न उद्या पाहायला मिळणार का ? हे देखील पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.