Pune news दहावी-बारावीची परीक्षा काॅपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात पार पडावी म्हणून राज्य मंडळाने शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतरही अनेक प्रकार समाेर येत आहेत. विशेषत: सीसीटीव्ही यंत्रणेमुळे काॅपीचे प्रकार पुढे आले आहेत.
धायरी परिसरातील एका केंद्रावर चक्क शिक्षकांनीच काॅपी पुरविल्याचे उघड झाले आहे. शाळेचा निकाल शंभर टक्के लागावा म्हणून असे प्रकार सुरू असल्याचे बाेलले जात आहे.
बुधवारची ही घटना. सकाळच्या सत्रात रसायनशास्त्राचा पेपर हाेता. येथे नियुक्त शिक्षकाला चिरीमिरी देऊन चहापानासाठी बाहेर पाठवले आणि तेथील शिक्षकाने वर्गाचा ताबा घेत विद्यार्थ्यांना लाँगबुक वाटून कॉपी करण्यास प्रवृत्त केले असल्याचे विद्यार्थ्यानेच पालकाला सांगितले. हे सर्व घडत असताना अचानक परीक्षा नियंत्रक वर्गात दाखल झाले आणि सर्वांचीच तारांबळ उडाली, असेही परीक्षार्थीने सांगितले.
अधिक माहितीनुसार, एका विद्यार्थिनीची काॅपी पकडली गेल्यानंतर तिने थेट संबंधित शिक्षकाकडेच बोट दाखवले. यानंतर परीक्षा नियंत्रकांनी विद्यार्थिनी आणि शिक्षक दोघांवरही कारवाईचा बडगा उगारला अन् विद्यार्थिनीचे गुण कापले, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. यावरून महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागावा म्हणून शिक्षकच असा प्रकार करत असल्याची बाब या घटनेवरून पुढे आली आहे. या प्रकारामुळे काॅपीमुक्त अभियानाला शिक्षकच सुरुंग लावत असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून केंद्रावर कडक तपासणी केली जात हाेती आणि पोलिस बंदोबस्तदेखील ठेवण्यात आला होता. एका वर्गात बाहेरील शिक्षकाची नियुक्तीदेखील करण्यात आली होती. पेपर सुरू होऊन सुमारे दीड तास उलटल्यानंतर संबंधित महाविद्यालयाचा एक शिक्षक वर्गात आला. त्याने नियुक्त शिक्षकाला चिरीमिरी देऊन चहासाठी जाण्यास सांगितले. ‘दहा मिनिटांत परत या’ असे सांगून तो निघून गेला. त्यानंतर त्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना चार ओळींमध्ये लाँगबुकचे वाटप केले.
विद्यार्थी लाँगबुकमधून उत्तरे उतरवत असतानाच परीक्षा नियंत्रक अचानक वर्गात दाखल झाले. काही विद्यार्थ्यांनी घाईघाईने काॅपी लपवली; मात्र एका विद्यार्थिनीने पेन्सिलने उत्तरपत्रिकेवर उत्तरे लिहिल्याने प्रकार उघड झाला. परीक्षा नियंत्रकांनी चौकशी केली असता विद्यार्थिनीने संबंधित शिक्षकाचे नाव घेतले. त्यानंतर दोघांवरही नियमानुसार कारवाई केल्याचे समजते. या प्रकरणामुळे परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
धायरी येथील परीक्षा केंद्रावर काॅपीचा प्रकार घडत असेल तर गंभीर आहे. या प्रकाराची तातडीने दखल घेऊन अधिक चाैकशी केली जाईल आणि दाेषींवर याेग्य कारवाई करण्यात येईल. – ए. एस. उकिरडे, अध्यक्ष, पुणे बोर्ड
