Pune News : तिजोरीच्या चाव्या हातात हव्या; भाजप नगरसेवकांची वरिष्ठांकडे

Pune News महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या उमेदवारांची नावे अंतिम झाल्यानंतर आता स्थायी समितीचे अध्यक्ष; तसेच सदस्यपदी वर्णी लावण्यासाठी इच्छुकांनी आपला मोर्चा वळवला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या १२ नगरसेवकांना स्थायी समितीच्या सदस्यपदी संधी मिळणार असून, त्यातूनच अध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यामुळे हे अध्यक्षपद पदरात पाडण्यासाठी बड्या राजकीय नेत्यांचे मन वळवण्यासाठी सर्व प्रकारचे ‘प्रयोग’ सुरू झाले आहेत.

स्थायी समितीवर १६ सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. राजकीय पक्षांचे सध्याचे संख्याबळ पाहता भाजपला १२, राष्ट्रवादी काँग्रेस दोन आणि काँग्रेसच्या एका सदस्याची वर्णी स्थायी समितीवर लागणार आहे. महापालिका तिजोरीच्या चाव्या आपल्याच हाती राहाव्यात, यासाठी भाजपमधील काही प्रमुख नगरसेवकांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, राजेंद्र शिळीमकर, रंजना टिळेकर, वर्षा तापकीर, अनिल उर्फ बॉबी टिंगरे, उमेश गायकवाड, हरिदास चरवड, मारुती तुपे आदींच्या नावाची स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये चर्चा सुरू आहे.

पुणे महापालिकेचे १६५ नगरसेवक हे ११ विधानसभा मतदारसंघांत पसरले आहेत. त्यातील सर्वाधिक नगरसेवक हे आठ मतदारसंघात आहेत. पुरंदर, भोर-वेल्हे-मुळशी आणि शिरूर मतदारसंघातील महापालिकेत समाविष्ट झालेल्या काही गावांत नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपने सभागृह नेतेपदी निवडणूक प्रमुख गणेश बीडकर यांची नियुक्ती केली आहे. मंजूषा नागपुरे यांना महापौरपदाची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमहापौरपद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले गट) देण्यात आले असून, परशुराम वाडेकर यांना ती संधी देण्यात आली आहे. बीडकर यांचा प्रभाग कसबा-कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात येतो. नागपुरे यांचाही प्रभाग पर्वती-खडकवासला विधानसभा मतदारसंघात पसरलेला आहे. वाडेकर हे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील आहेत.