“फॅक्टरी डिफेक्ट असतात… ते बाजूला काढावेच लागतात”

अमोल बालवडकरांवर भाजपचा थेट हल्ला, तिकीट कापण्यामागचं वास्तव उघड

पुणे | विशेष प्रतिनिधी

भाजपकडून उमेदवारी नाकारल्यानंतर अमोल बालवडकर यांनी सुरू केलेल्या राजकीय गोंधळाला आता भाजपकडून थेट, कठोर आणि स्पष्ट उत्तर मिळाले आहे. “कारखान्यात तयार होणाऱ्या मालात जसा फॅक्टरी डिफेक्ट असतो आणि तो बाजूला काढावा लागतो, तसंच राजकारणातही दोषी प्रवृत्ती वेळीच दूर कराव्या लागतात,” अशा शब्दांत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने अमोल बालवडकरांवर घणाघात केला आहे.

भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार हा निर्णय अचानक घेतलेला नसून, त्यामागे अनेक महिन्यांची निरीक्षणे, माहिती आणि पडताळणी होती. अमोल बालवडकर यांचा जो वादग्रस्त व्हिडिओ काल समाजमाध्यमांवर व्हायरल झाला, तो गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आधीपासूनच माहिती होता, असा खळबळजनक दावा यावेळी करण्यात आला. देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ नेत्यांनी ती क्लिप पाहून तिची सत्यता तपासण्यासाठी गृहमंत्रालयाच्या माध्यमातून एआय आणि तांत्रिक चौकशीही करून घेतली होती. तपासणीनंतर ही बाब गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतरच उमेदवारी नाकारण्याचा निर्णय घेतला गेला, असे भाजप नेतृत्व सांगते.

तरीही शेवटच्या क्षणापर्यंत अमोल बालवडकर यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू होता, असेही नेत्यांनी स्पष्ट केले. “तिकीट द्यायचं नसतं तर आम्ही त्याला फॉर्म भरण्याच्या वेळेपर्यंत तंगवू शकत होतो, पण तसे केले नाही. मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र जेव्हा वास्तव समोर आलं, तेव्हा तीन तास शिल्लक असतानाही आम्ही स्पष्ट सांगितलं की तिकीट देता येणार नाही,” असा खुलासा करण्यात आला.

याच क्षणापासून अमोल बालवडकर थेट अजित पवारांकडे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा फॉर्म घेऊन परतले, यावरूनही भाजपने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “इतक्या वेगात अजित पवारांचा फॉर्म मिळणं म्हणजे आधीपासूनच लाईझनिंग सुरू होती का? अजित पवार वाट पाहत बसले होते का?” असा थेट सवाल भाजपकडून विचारण्यात आला आहे.

या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपला आत्मविश्वासही ठामपणे मांडला आहे. “मी जे काही बोलतो ते एनालिसिसवर आधारित असतं. माझ्या भविष्यवाण्या खऱ्या ठरतात. आजच लिहून ठेवा – १६ तारखेला भेटू, महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य लहू बालवडकर यांचेच असेल,” असा ठाम दावा भाजप नेत्यांनी केला आहे.

एकीकडे अमोल बालवडकर राष्ट्रवादीत दाखल होऊन बंडखोरीचे राजकारण खेळत असताना, भाजपने मात्र पक्षशिस्त, स्वच्छ प्रतिमा आणि विश्वासार्ह नेतृत्वावर भर देत लहू बालवडकर यांना पुढे केले आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ९ मधील ही लढत आता केवळ निवडणूक न राहता, भाजप विरुद्ध बंडखोरी अशी थेट राजकीय कसोटी बनली आहे आणि या कसोटीचा अंतिम निकाल मतदारच लावणार आहेत.