टिळेकर बंधूंच्या एकधिकार शाही असलेली सत्ता उलथवून क्रांती करावी लागेल’

शशिकांत शिंदे; प्रभाग ४०च्या उमेदवारांसाठी पदयात्रा

कोंढवा/कात्रज
सामुदायिक व निर्भीडपणे उठाव केल्यास क्रांती घडते. ती क्रांती वर्षांनुवर्षे एकधिकारशाही असलेली सत्ता उलथवून तुम्हाला करावी लागेल. भीतीचे कोणतेही कारण नाही आम्ही तुमच्या सोबत आहोत असे मत राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले. प्रभाग ४० मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार गंगाधर विठ्ठल बधे, वर्षा सतीश मारकड, सपना अमोल धर्मावत व सुरेश लक्ष्मण कवडे यांच्या प्रचारार्थ गोकुळनगर येथील विठ्ठल मंदिर येथे कॉर्नर सभा व पदयात्रेचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी शिंदे बोलत होते.

शिंदे म्हणाले, पुणे शहरात पालिकेच्या सत्तेच्या माध्यमातून भाजपची एकाधिकार शाही, दडपशाही सुरू आहे. सत्तेची मस्ती चढली असल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढत असून नागरिकांनी निर्भीडपणे मतदान करावे. पुण्यात सर्वसामान्य माणसाची सत्ता बसवायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी समन्वयक अंकुश काकडे म्हणाले की, कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी, कात्रज-कोंढवा रोड परिसरातील जनता सुज्ञ आहे. दोन तुतारी व दोन घड्याळ असे संपूर्ण पॅनलला मतदान करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी महिला शहराध्यक्षा स्वाती पोकळे, सतीश मारकड, अमोल धर्मावत, विश्वराज वाघमोडे, बिभीषण खरात आदींसह गोकुळनगर व कात्रज-कोंढवा रोड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो : गोकुळनगर येथे प्रभाग ४० राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व शशिकांत शिंदे, अंकुश काकडे व मान्यवर