भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना मोठे यश; पिंपरी चिंचवड शहरातून पहिला नगरसेवक बिनविरोध

पिंपरी प्रतिनिधी -: भाजपने नगरपालिकेप्रमाणेच महापालिका निवडणुकीत विजयी सलामी दिली असून भाजपचे राज्यभरातून उमेदवार विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेतून भाजपच्या विजयाचा श्रीगणेशा झाला.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भोसरी प्रभाग क्रमांक 6 मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रवी लांडगे यांनी पुन्हा एकदा बाजी मारत सलग दुसऱ्यांदास बिनविरोध निवडून येण्याचा मान पटकावला आहे. तसेच त्यांनी भाजपमध्ये विजयाचं खातं देखील उघडलं आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने आणि काहीं उमेदवारांनी माघार घेतल्याने लांडगे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

रवी लांडगे यांच्या विरोधात उभे असलेल्या उमेदवारांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद अपक्ष उमेदवार प्रसाद काटे यांचा अर्ज छाननी प्रक्रियेत बाद ठरवण्यात आला. तर मनसेचे उमेदवार निलेश सूर्यवंशी यांच्याकडे जात प्रमाणपत्र नसल्याने त्यांचा अर्ज बाद झाला. विशेष म्हणजे राष्ट्रवादीने संतोष काळुराम लांडगे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांचा अर्ज दाखल न झाल्याने लांडगे यांचा मार्ग मोकळा झाला. सलग दोनवेळा बिनविरोध निवडून येणारे रवी लांडगे हे शहरातील पहिले लोकप्रतिनिधी ठरले असल्याने चर्चेचा विषय बनले आहेत .