Pune News पुणे : “कार्यकर्त्यांची निष्ठा ही निवडणुकीच्या उमेदवारीशी नसून ती पक्षाशी असते. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या तत्वावर भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता काम करत असतो,” असे ठाम प्रतिपादन लहु बालवडकर यांनी केले. प्रभाग क्रमांक ९ (ड) मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
बालवडकर म्हणाले की, पक्षाने उमेदवारी देताना तळागाळातील कार्यकर्त्यांची निष्ठा, सातत्य आणि प्रामाणिकपणा यांना प्राधान्य दिले आहे. “आज सामान्य कार्यकर्त्याला आणि प्रामाणिकपणाला उमेदवारीतून न्याय मिळाल्याचा मला अभिमान आहे. पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर दाखवलेला विश्वास हा माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठी जबाबदारी आहे. मी माझ्या पक्षाचा आणि नेतृत्वाचा कायम ऋणी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक राजकारणात वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा संघटन मजबूत करणे आणि पक्षाच्या विचारधारेवर ठाम राहणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. “उमेदवारी मिळाली म्हणजेच लोकसेवेची खरी सुरुवात असते. नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर प्रभावी उपाय करणे, हेच माझे प्राधान्य राहील,” असे बालवडकर म्हणाले.
प्रभागातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, महिला व ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, तसेच पारदर्शक प्रशासन या मुद्द्यांवर ठोस काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. “जनतेच्या विश्वासावर उतरून, कोणताही भेदभाव न करता विकासकामे केली जातील. पक्षाची विचारधारा आणि लोकहित या दोन्हींचा समतोल साधून काम केले जाईल,” असेही त्यांनी नमूद केले.
पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी दिल्यामुळे भाजपातील तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी निवडणुकीत संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
