मोहन भागवतांना शिव्या देणाऱ्यांना लोकांना भाजपात स्थान दिले हे क्लेशदायक – राम वाकडकर

वाकड प्रतिनिधी -: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. पण त्यांच्या प्रवेशाला भाजपमधूनच तीव्र विरोध होत आहे.

प्रभाग क्रमांक 25 मध्ये भाजपचे इच्छुक उमेदवार आणि शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांनी उघडपणे कलाटे यांच्या प्रवेशाला विरोध दर्शवला आहे. राम वाकडकर यांनी आरोप केला की, भाजपमध्ये प्रवेश करून थेट उमेदवारी तिकीट मिळवण्याचे षडयंत्र राहुल कलाटे यांचे आहे. “सरसंघचालक मोहन भागवत यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या आणि आरएसएसच्या एका पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला भाजपमध्ये स्थान देऊ नये,” अशी ठाम मागणी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

“गेल्या बारा वर्षांपासून आम्ही भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. प्रभाग क्रमांक 25 मध्ये भाजपचा एकही सदस्य नसताना देखील आम्ही संघटन वाढीसाठी काम करत होतो. पक्ष कोणालाही उमेदवारी देईल, त्याच्यासाठी आम्ही काम करू; मात्र आयात उमेदवाराला पक्षात घेण्यास आमचा स्पष्ट विरोध आहे”, अशी भूमिका भाजपचे उपाध्यक्ष राम वाकडकर यांनी मांडली.

राहुल कलाटे यांची राजकीय कारकीर्द विश्वासार्ह नसल्याचा आरोप राम वाकडकर केला. “राहुल कलाटे यांनी आतापर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) अशा विविध पक्षांकडून निवडणुका लढवल्या आहेत. चार विधानसभा निवडणुकांपैकी एका निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त झाले असून, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतही त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता”, असं राम वाकडकर म्हणाले.