TET Exam टीईटीबाबत मोठी घडामोड बहुप्रतीक्षित उत्तरसूची जाहीर

Pune News राज्य परीक्षा परिषदेतर्फे २३ नोव्हेंबर रोजी राज्यभरात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेनंतर उमेदवारांना उत्तरसूची कधी जाहीर होणार याची उत्सुकता होती.

त्यानुसार परीक्षा परिषदेने पेपर क्रमांक १ व पेपर क्रमांक २ ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची जाहीर केली आहे.

परीक्षेतील पेपर क्रमांक १ आणि पेपर क्रमांक २ ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची https://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी, आक्षेप असल्यास परिषदेकडे २७ डिसेंबरपर्यंत पाठवता येणार आहेत. संबंधित आक्षेप, त्रुटीबाबतचे निवेदन पुराव्यासह संकेतस्थळावरील उमेदवारांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी या लिंकद्वारे पाठवता येतील. आक्षेप, त्रुटींबाबत लेखी निवेदन समक्ष, टपालाने, ई-मेलद्वारे पाठवल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. दिलेल्या मुदतीत मुदतीत ऑनलाइन पद्धतीने प्राप्त झालेल्या आक्षेपांचाच विचार करून विषय तज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसुची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे परीक्षा परिषदेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.