Pune News मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला एक वर्ष उलटून गेले आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि इतरांविरोधात आज कोर्टात आरोप निश्चितीची सुनावणी सुरू आहे.
आरोपींनी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याबाबत न्यायालयात आक्षेप नोंदवला आहे. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांना वगळता उर्वरित आरोपींनी उज्ज्वल निकम हे एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचा आरोप करत, त्यांना या प्रकरणातून बाजूला करण्यात यावे, असा अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. या अर्जामुळे खटल्याला वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. न्यायाधीशांनी विशेष सरकारी वकील अॅड. उज्जवल निकम यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर निकम यांनी बाजू मांडली. अॅड. निकम यांनी आरोपींकडून घेण्यात आलेल्या आक्षेपाचा अर्ज फेटाळण्याची मागणी केली.
अॅड. उज्जवल निकम यांनी भाजपकडून २०२४ मध्ये मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर केंद्र सरकारच्या शिफारसींवर राष्ट्रपतींनी अॅड. निकम यांची राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून नियुक्ती केली.
दरम्यान, आरोपी क्रमांक दोन विष्णू चाटे याच्या जामीन अर्जावर न्यायालयात सविस्तर युक्तिवाद झाला. चाटे याच्या वतीने सादर करण्यात आलेल्या युक्तिवादात, सुरुवातीच्या दोन एफआयआरमध्ये विष्णू चाटे यांचे नाव नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला. तसेच, चाटे यांच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसून त्यांचा गुन्हेगारी इतिहास नाही, असा दावा त्यांच्या वकिलांनी केला.
यावर सरकारी पक्षाने जोरदार प्रतिवाद केला. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, विष्णू चाटे याने वारंवार आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणीची मागणी केली होती. तसेच, तो सुरुवातीपासूनच या गुन्ह्यात सक्रिय सहभागी असल्याचे तपासात स्पष्ट झाले असल्याचा दावा सरकारी पक्षाने न्यायालयासमोर केला.
