Police Station Pune: पुणे शहरात पाच नवीन पोलिस ठाणी, दोन परिमंडळांना मंजुरी

Pune News शहराचा वाढता विस्तार, तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन राज्यशासनाने आणखी पाच नवीन पोलीस ठाण्यांसह दोन परिमंडळांच्या निर्मितीचा प्रस्ताव रविवारी मंजूर केला. राज्य शासनाने तीन पोलीस उपायुक्त आणि सहा सहायक आयुक्तांची पदेही मंजूर केली असून, पुणे पोलिसांना अतिरिक्त ८३० पोलीस शिपायांचे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबरोबर तीन उपायुक्‍त आणि सहा सहायक पोलिस आयुक्‍त यांच्‍या पदांना देखील दि.14 डिसेंबर 2025 च्‍या शासननिर्णयाद्वारे मंजुरी देण्यात आली आहे.

लोहगाव, लक्ष्मीनगर, नर्हे, येवलेवाडी, मांजरी या पोलिस ठाण्यांना तर तर शहरासाठी परिमंडळ (झोन) 6 आणि परिमंडळ 7 यांना देखील मंजुरी मिळाली आहे. त्याबरोबरच 830 अधिकचे मनुष्यबळ मंजुर करण्यात आले.

विमानतळ पोलिस ठाण्यातून लोहगाव पोलिस ठाणे, येरवडा पोलिस ठाण्यातून लक्ष्मीनगर पोलिस ठाणे, सिंहगडरोड पोलिस ठाण्यातून नर्हे पोलिस ठाणे, कोंढवा आणि भारती विद्यापीठमधून येवलेवाडी पोलिस ठाणे, हडपसर पोलिस ठाण्यातून मांजरी पोलिस ठाणे यांना मंजुरी मिळाली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वित्त व गृहविभागाला नवीन पोलिस ठाण्यांचा, मनुष्य बळाचा, दोन नवीन झोनचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्या पुणे शहरातील गुन्हेगारीचा लेखा जोखा मांडताना पुण्यात आणखी पोलिस ठाण्यांची आवश्यकता का आहे हे नमूद करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर आता ही पाच पोलिस ठाणे शहरात होणार आहेत. त्‍यावर शासननिर्णयाद्वारे शिक्‍कामोर्तब करण्यात आले असून त्‍यासाठी निधीची देखील तरतूद करण्यात आली आहे.