ज्ञानराधा मल्टीस्टेटचा मोठा घोटाळा उघड प्रशासना पुढे मोठा पेच निर्माण

Beed news Dnyanradha – 

ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या तिजोऱ्यांत पावणेचार लाख ठेवीदारांनी २ हजार ९५९ कोटी रुपयांच्या ठेवी ठेवल्या. मात्र, कुटेने या सगळ्या ठेवी स्वत:च्याच उद्योगांना कर्ज म्हणून घेतल्याचे समोर आले आहे.

ज्ञानराधा मल्टिस्टेटने जादा व्याजदराचे आमिष दाखवून बीडसह राज्यभरातील लाखो लोकांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी बुडवल्या. ज्ञानराधा मल्टिस्टेटचे बीड जिल्ह्यात ८७ गुन्हे दाखल आहेत.

३ हजार ६९६ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. त्यातील ३ हजार ५५४ कोटी रुपयांचे कर्ज एकट्या कुटे उद्योग समूहाच्या विविध उद्योगांसाठी वळविले आहे. कर्जदार अर्चना व सुरेश कुटे दोघेही कोठडीत आणि त्यांच्या मालमत्ताही ‘एमपीआयडी’खाली जप्त असल्याने आता वसुली करायची कशी, असा पेच ‘ज्ञानराधा’च्या प्रशासकाला पडला आहे.

‘ज्ञानराधा सोसायटी’तर्फे ठेवीदारांच्या फसवणुकीनंतर केंद्रीय सहकार विभागाने तत्कालीन जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली. प्रशासक नेमून वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर ठेवीदारांच्या हाती काय, असा प्रश्‍न कायम आहे. या पार्श्वभूमीवर समोर आलेले वास्तव भयानकच आहे. प्रशासकांचे मूळ काम कर्जाची वसुली करून ठेवीदारांना रक्कम देणे आहे. मात्र, आता कर्जवसुली करायची कुणाकडून, असा प्रश्‍न आहे.

ज्ञानराधा’च्या विविध शाखांमध्ये ३७६२५६ खातेदार व ठेवीदारांच्या सुमारे २९५९ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. तुलनेत ‘ज्ञानराधा’कडून कर्जवाटपाचा आकडा अगदीच नगण्य आहे. ६५५२ कर्जदारांना ३६९६ कोटी रुपये कर्ज दिले आहे. त्यात एकट्या सुरेश कुटेने स्वत: व पत्नीच्या कुटे समूहाच्या विविध उद्योगांना ८८ कर्जप्रकरणांतून तब्बल ३५४५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. उर्वरित ६४६४ कर्जदारांकडे केवळ १५१ कोटी ८० लाख रुपयांचे कर्ज आहे. यातील एक ५० कोटींचा कर्जदारही कुटेशी संबंधित आहे.

‘ज्ञानराधा’मधून सुरेश कुटेच्या उद्योग समूहालाच बहुतांश कर्ज असून त्याच्या मालमत्ता सक्तवसुली संचालनालय (ईडी), शासनाने जप्त केल्या आहेत. उर्वरित सुवर्ण व इतर कर्जाची वसुली केली जात आहे. १४६ सोने कर्जदारांकडून ७४ लाख रुपयांची वसुली केली आहे.

– समृत जाधव, प्रशासक, ज्ञानराधा मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, बीड