जून ते ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टी, अवकाळीची मदत मंजूर

pune राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांचं अतोनात नुकसान झाले. राज्य सरकारने ४ लाख ६ हजार ४३० हेक्टर क्षेत्रावरील बाधित शेतीपिकांसाठी ४८२ कोटी १० लाख ६९ हजार रुपयांच्या वितरणास मंजुरी दिली आहे.

सरकारने याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी (ता.९) जारी केला आहे. यामध्ये दोन हेक्टरच्या मर्यादेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

राज्यात अतिवृष्टीने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार जून ते सप्टेंबर दरम्यान ८४ लाख हेक्टरवरील शेती पिकं बाधित झाली. त्यासाठी राज्य सरकारने ३१ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. परंतु शासन निर्णयात मात्र मदतीचे दर आणि निकष जुनेच ठेवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची तुटपुंज्या मदतीवर बोळवण करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

नागपूर विभागासाठी किती मदत?

राज्य सरकारने ०-२ हेक्टरच्या मर्यादेत नागपूर विभागातील पाच जिल्ह्यांसाठी २०९ कोटी ३८ लाख ९१ हजार रुपयांच्या वितरणास मंजुरी दिली आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील २८ कोटी ९८ लाख ५५ हजार रुपयांना मंजूर दिली आहे.

तर नागपूर जिल्ह्यासाठी ऑक्टोबरच्या अवकाळीसाठी १७ कोटी २३ लाख ६४ हजार रुपये मंजूर केले आहेत. तर गडचिरोली जिल्ह्यासाठी ३३ लाख ३० हजार, भंडारा जिल्ह्यात ऑक्टोबरच्या अवकाळीसाठी ८४ कोटी ६९ लाख २६ हजार तर जूनसाठी ५६ हजार आणि गोंदिया जिल्ह्यात ७८ कोटी १३ लाख ६० हजार रुपयांच्या वाटपास मंजुरी दिली आहे.

अमरावती विभागासाठी मदत

अमरावती विभागात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळीमुळे शेतीपिकांचं नुकसान झाले. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यांसाठी ८ कोटी १२ लाख १ हजार रुपयांच्या वाटपास मान्यता देण्यात आली आहे.

पुणे विभागातील तीन जिल्हे

कोल्हापूर, पुणे आणि सांगली जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळीसाठी ११ कोटी ९० लाख १६ हजार रुपयांच्या वितरणास मंजूर देण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूरसाठी १ कोटी २५ लाख ६ हजार रुपये, पुणे जिल्ह्यासाठी १० कोटी ५९ लाख २६ हजार रुपये, सांगली जिल्ह्यासाठी ५ लाख ८४ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.

कोकण विभागातील पाच जिल्हे

कोकण विभागासाठी ऑक्टोबर महिन्यातील नुकसानीसाठी ४८ कोटी ५९ लाख ९ हजार रुपये मदत मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यासतही १६ कोटी ८१ लाख ८९ हजार रुपये, पालघर जिल्ह्यासाठी ९ कोटी ३२ लाख ३६ हजार रुपये, रायगड जिल्ह्यासतही १४ कोटी ६९ लाख ३३ हजार रुपये, रत्नागिरी जिल्ह्यासाठी ३ कोटी ६६ लाख ८२ हजार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ४ कोटी ८ लाख ६९ हजार रुपये वाटपास मंजूर देण्यात आली आहे.

नाशिक विभागातील २०४ कोटी

नाशिक विभागातील ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी नाशिक जिल्ह्यासाठी ४९ कोटी ९३ लाख ३९ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. तर धुळे जिल्ह्यासाठी ५६ कोटी ९६ लाख ५६ हजार रुपये, नंदुरबार जिल्ह्यासाठी २९ कोटी ७८ लाख ६६ हजार रुपये, जळगाव जिल्ह्यासाठी ५९ कोटी ७८ लाख ३७ हजार रुपये तर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ७ कोटी ६३ लाख ५४ हजार रुपये वितरित करण्यात येणार आहेत.