5 लाखांची मदत देणार; पुणे महापालिकेचा मोठा निर्णय

Pune पुणे महापालिकेत कामावर असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आता तत्काळ ५ लाखांची मदत दिली जाणार आहे.

याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी कामगार कल्याण विभागास दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी एकाच दिवशी महापालिकेतील तीन कर्मचाऱ्यांना हृदयरोगाचा झटका आला. त्यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून, दोन कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर आहे. ही माहिती मिळताच आयुक्तांनी तातडीने मदत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत. सध्या महापालिकेकडून कामावर असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास ७५ हजारांची मदत दिली जाते.

पुणे शहरात महापालिकेचे सुमारे १८ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी महापालिकेकडून सामूहिक अपघात विमा उतरविण्यात आला आहे. अपघात अथवा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास संबंधित कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना २५ लाखांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. मात्र नैसर्गिक मृत्यू झाल्यास मदत देण्याची कोणतीही तरतूद नसल्याने अशा प्रसंगी कुटुंबियांना मदत करणे शक्य होत नाही. त्यामुळे भविष्यात असे प्रकार घडल्यास कुटुंबियांना तत्काळ मदत मिळावी, या उद्देशाने पाच लाखांची मदत देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. हा लाभ तृतीय आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना दिला जाणार असल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले