पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांचा पक्ष बॅकफूटवर

PCMC NCP News :- पिंपरी-चिंचवड शहरावर राष्ट्रवादी काँग्रेस एकेकाळी बालेकिल्ला होता. सलग पंधरा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराने सन २०१७ मध्ये राष्ट्रवादीवर बेछूट आरोप झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता भाजपने उलथवून टाकत महापालिका ताब्यात घेतली. परंतु, तब्बल आठ वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर, महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू आहे. तत्पूर्वी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक भाजप प्रवेशासाठी उत्सूक असून, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला ऐन निवडणुकीच्या तोंडावर गळती लागण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची तब्बल पंधरा वर्षे निर्विवाद वर्चस्व होते. त्यामुळे शहराचे कारभारी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहर विकासकामांत लक्ष दिले. शहराला देशात स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर विकासकामांमुळे राहण्यायोग्य शहर म्हणून नागरिकांनी पसंती दिली. मात्र, विकास कामे करून २०१७ मध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाला. त्यानंतर महापालिकेची सत्ता भाजपच्या हाती गेली. त्यानंतर अजित पवारांचे शहरावरील लक्ष हळूहळू कमी होत गेले.

निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचा उत्साह संचारला
पिंपरी-चिंचवड शहरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीची शहरात अधिक बळ आहे. पिंपरी विधानसभेत अण्णा बनसोडे हे पक्षाचे आमदार आहेत. ते विधानसभा उपाध्यक्ष आहेत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात गेलेले माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे हे माजी नगरसेवकांसोबत पुन्हा स्वगृही परतले आहेत. हातातून निसटलेली सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी पक्षाने संघटन बळकट केले आहे. पक्षाचे नव्याने शहर कार्यकारिणी तयार करून सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी जनसंवाद घेत, महापालिका, पीएमआरडीए, एमआयडीसी, महावितरण, म्हाडा, पोलीस तसेच, इतर सरकारी विभागांशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागास सक्त सूचना केल्या. तसेच, पवार यांनी शहरातील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या थेट घरी जात संपूर्ण शहर पिंजून काढले. छोटे छोटे मेळावे घेत त्यांना ताकद दिली. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पवार हे पिंपरी-चिंचवड महापालिकासंदर्भातील कामांना प्राधान्य देत असून, आयुक्तांना त्या संदर्भात नियमितपणे सूचना देत आहेत. त्यावरुन पवारांचे पिंपरी-चिंचवडवर विशेष लक्ष असल्याचे दिसून येत आहे.