Winter Health Tips :
फळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. केळींबद्दल बोलायचे झाले तर, ते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. जर तुम्ही दिवसातून फक्त दोन केळी खाण्यास सुरुवात केली तर तुमच्या आरोग्यात चांगले बदल होऊ शकतात.
केळी हे असे फळ आहे जे खाऊन तुम्ही अतिरिक्त वजन कमी करण्यासोबतच चांगली बॉडी सुद्धा बनवू शकता. हिवाळ्यात जीममध्ये जाऊन किंवा मैदानी सरावादरम्यान घाम गाळणाऱ्यांसाठी तर केळी अतिशय पौष्टिक आहार स्त्रोत आहे. या विषयावर जळगावमधील जे. पी. पी प्राकृतिक चिकित्सा आणि योग केंद्रांच्या संस्थापक आहार तज्ज्ञ डॉ. सोनल महाजन यांच्याशी ‘लोकसत्ता’ने संवाद साधला.
फळांच्या रचनेनुसार गर असलेली, रसाळ तसेच चवीने आंबट, गोड आणि आंबटगोड, अशा वर्गीकरणात केळी हे फळ गोड आणि गरयुक्त फळांमध्ये अग्रक्रमाने गणले जाते. पोट भरण्याची क्षमता, सहज पचणारा स्वभाव आणि भरपूर ऊर्जा देणारे गुणधर्म यामुळे केळीला ‘संपूर्ण आहार देणारे फळ’ म्हणूनही ओळख मिळाली आहे. केवळ पिकलेली केळीच नव्हे तर केळीची पाने, खोड, केळफुल, कच्ची केळी आणि अगदी सालदेखील विविध प्रकारे मानवासाठी तसेच निसर्गातील इतर घटकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. त्यामुळे केळीला बहुउपयोगी आणि सर्वांगपूर्ण असे फळ मानले जाते. जळगाव जिल्ह्यात कपाशीसोबत मुख्य पीक म्हणून केळी पिकाला विशेष स्थान असून, जिल्ह्यास जागतिक पातळीवर वेगळी ओळख मिळवून देण्यात या पिकाचा मोठा वाटा आहे. सुपीक मातीत भरघोस उत्पादन देणारी केळीची शेती स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणारी ठरली आहे. देश-विदेशातील बाजारपेठेतही जळगावची केळी मोठ्या प्रमाणावर पसंत केली जाते.
बाजारात अनेक फळे हंगामावर विक्रीसाठी येतात. परंतु, सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे आणि पोषणमूल्यांनी समृद्ध असे फळ म्हणून केळीची सर कोणालाच नाही. लहान मुले, तरुण, ज्येष्ठ नागरिक सर्व वयोगटातील लोकांसाठी केळी हे सहज सेवन करता येणारे फळ आहे. केळीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सहज उपलब्धता. गाव-शहर कुठेही वर्षभर केळी मिळतात. त्यांना धुण्याची आवश्यकता नसते; स्वच्छतेच्या दृष्टीने त्यांची साल नैसर्गिक संरक्षक कवचासारखी काम करते. मऊपणा, पचनास सोपे असणे आणि थोड्याच प्रमाणात खाल्ले तरी पोट भरण्याचे समाधान देण्याची क्षमता, ही केळीची काही गुण वैशिष्ट्ये आहेत. दात नसलेल्या व्यक्तींनाही सहजपणे खाता येण्याइतकी त्यांची रचना मऊ असल्याने केळी हे सर्वसमावेशक आणि उपयुक्त फळ आहे, असे जळगावमधील आहार तज्ञ डॉ. सोनल महाजन यांनी सांगितले.
एक मध्यम आकाराच्या केळीमध्ये साधारण २८ ग्रॅम कार्बोदके, १५ ग्रॅम नैसर्गिक शर्करा, एक ग्रॅम प्रथिने आणि तीन ग्रॅम तंतुमय पदार्थ (फायबर) आढळतात. एकाच फळातून शरीराला सुमारे १०५ कॅलरीज उष्मांक मिळत असल्याने जीममध्ये बॉडी बनवण्यासाठी धडपडणाऱ्या तसेच पोलीस, सैनिकी भरतीसाठी मैदानी सराव करणाऱ्या तरुणांसाठी केळी अतिशय पौष्टिक आणि ऊर्जा देणारा आहार स्त्रोत सिद्ध झाला आहे. केळीत मुबलक प्रमाणात असणारे मँगनीज हृदयाचे तसेच त्वचेचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. ऊर्जा मोठ्या प्रमाणात मिळूनही केळीत फॅट्सचे प्रमाण जवळपास नगण्य असल्याने हे फळ आरोग्यासाठी अधिक सुरक्षित मानले जाते. आयुर्वेद आणि निसर्गोपचारात केळीला विशेष स्थान आहे. पोटॅशियम, मँगनीज, फॉस्फरस यांसारखी खनिजे आणि जीवनसत्व क व बी-६ यांमुळे शरीराची ताकद, मानसिक ताजेतवानेपणा आणि बौद्धिक कार्यक्षमतेला सकारात्मक लाभ मिळतो. पचनाला सहाय्य करणारे तंतुमय घटक आणि नैसर्गिक शर्करा यामुळे पोट स्वच्छ राहून ऊर्जा टिकून राहते. केळीत असलेल्या पोटॅशियमच्या भरपूर मात्रेमुळे रक्तदाब स्थिर राहतो,
पचनसंस्था निरोगी राहते
केळी पचनासाठी देखील खूप फायदेशीर आहेत. केळीमधील आहारातील फायबर पचनास मदत करते. त्यामध्ये प्रीबायोटिक्स देखील असतात, जे आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रोत्साहन देतात. बद्धकोष्ठता रोखण्यासाठी देखील केळी खूप प्रभावी आहेत.
