शिवसेनेच्या आंदोलनाला मोठे यश; कॅनॉल पुल दुरुस्तीसाठी 1.65 कोटींचा निधी मंजूर..!!

हडपसर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये ससाणेनगर–हिंगणे मळा परिसरातील कॅनॉल पुलाचा कॉलम ढासळून गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला होता. तब्बल 90 दिवस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संताप वाढत होता. या धोकादायक परिस्थितीची दखल घेऊन विषयावर तातडीने निर्णय होणे अत्यंत आवश्यक होते, कारण या पुलाचा वापर हजारो नागरिक दररोज करत असून त्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला होता.

या गंभीर प्रश्नाबाबत शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख मा. उल्हासभाऊ तुपे यांच्या नेतृत्वाखाली सौ. शैलजा ताई भानगिरे, सौ. अयोध्या ताई आंधळे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी प्रभावी आंदोलन उभारून प्रशासनाला जाग आणली. या प्रखर आंदोलनाचा परिणाम म्हणून पुणे महानगरपालिका आयुक्तांनी तात्काळ 1.65 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून पुढील तीन दिवसांत कॅनॉल पुल दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू करण्याचे आदेश जारी केले. शिवसेनेच्या संघर्षाला मिळालेलं हे मोठं यश असून स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला मिळालेला दिलासा आहे.

या आंदोलनात शिवसेना उपशहर प्रमुख दत्ता खवळे, बबन आंधळे, राहुल काळे, सिद्धार्थ भानगिरे, बबन पवार, बंडू सोनवणे, अनिल तावरे, नाना भिसे, अक्षय अवती, सोमनाथ काळे, मनीष डाळिंबकर, विपुल मोरे, शरनापा कापसे तसेच परिसरातील सर्व ग्रामस्थ आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. एकजुटीने लढलेल्या या संघर्षाने नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारी भूमिका अधोरेखित झाली. शिवसेना नेहमीप्रमाणेच पुढेही जनतेच्या प्रश्नांसाठी अथकपणे संघर्ष करीत राहील, हा स्पष्ट संदेश या आंदोलनातून पुन्हा अधोरेखित झाला.