संभाजीनगर : चिकलठाण्यातील औद्योगिक वसाहतीलगतची कोट्यवधी रुपयांची ब्रिजवाडीतील ५४ एकर गायरान जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर विकण्याचा डाव उघडकीस आला. महसूलमंत्री, विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या, शिक्के, लेटरहेड करून हा घोटाळा केला जाणार होता.
ब्रिजवाडीतील सर्व्हे क्रमांक एकची गट क्रमांक ३० मधील क्षेत्रफळ ५४ एकर ३० गुंठे गायरान जमीन आहे. या जमिनी खरेदी व विक्रीचा २८ ऑगस्ट २०२५ रोजीचा आदेश गेवराईचे नायब तहसीलदार संजय सोनवणे यांना प्राप्त झाला. त्यांना हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे स्वीय सहायक दीपक आगळे यांना व्हॉट्सॲपवर पाठवून आपल्या कार्यालयाकडून निर्गमित झालाय का, याबाबत विचारणा केली. आगळे यांनी वरिष्ठांना हा प्रकार कळवला. तपासात असा कुठलाच आदेश निघाला नसल्याचे समोर आले. तब्बल ५४ एकर ३० गुंठे गायरान जमीन विकण्याचा डाव आखल्याचे समोर आल्याने जिल्हाधिकारी कार्यालय हादरून गेले. त्यानंतर नायब तहसीलदार संजय शिंदे यांना पोलिसांकडे याबाबत तक्रार करण्याचे आदेश देण्यात आले. सिटी चौक पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक अजीत दगडखैर यांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
