पुणे : पुणे महानगरपालिकेच्या (PMC) कनिष्ठ अभिय अभियंता (सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकेनिकल) भरती परीक्षा १ डिसेंबर २०२५ रोजी होणार होती. मात्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान २ डिसेंबरला असल्याने हजारो उमेदवारांना परीक्षा व मतदान एकत्र सांभाळणे अशक्य बनले होते. याच पार्श्वभूमीवर पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चाने (भाजयुमो) गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाठपुरावा केला होता. अखेर प्रशासनाने उमेदवारांच्या गैरसोयीचा विचार करून परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.
भाजयुमोचे पुणे शहर अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्या नेतृत्वात युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने गेल्या आठवड्यात महापालिका आयुक्त रामकिशोर नवल यांना सविस्तर निवेदन सादर केले होते. मतदानाचा मूलभूत हक्क, निवडणूक ड्युटी असलेल्या उमेदवारांची अडचण, काही केंद्रांवरील तांत्रिक समस्या आणि परीक्षा पूर्णतः पारदर्शक व सुरक्षित व्हावी यासाठी केवळ TCS iON सारख्या उच्चस्तरीय डिजिटल केंद्रांचाच वापर करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली होती.
१ डिसेंबरला परीक्षा व २ डिसेंबरला मतदान
– अनेक उमेदवारांना २५०-४०० किमी प्रवास करून मूळ गावी जायचे होते
– परीक्षा संपल्यानंतर त्वरित निघणे व दुसऱ्या दिवशी सकाळी मतदान केंद्र गाठणे अशक्य
– काही उमेदवारांना निवडणूक ड्युटीही बजावायची होती
– काही परीक्षा केंद्रांवर तांत्रिक त्रुटींच्या तक्रारी
या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून PMC च्या सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत आदेश काढत परीक्षा स्थगित केली.
दुष्यंत मोहोळ यांची प्रतिक्रिया
“उमेदवारांचा मतदानाचा हक्क अबाधित राहावा आणि परीक्षा पूर्णपणे पारदर्शक व सुरक्षित व्हावी हीच आमची भूमिका होती. प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल आयुक्त महोदयांचे आभार. पुढील परीक्षा केवळ TCS iON सारख्या अत्याधुनिक व विश्वासार्ह केंद्रांवरच घ्यावी, ही आमची ठाम मागणी कायम आहे,” असे भाजयुमो शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
उमेदवारांतून समाधान
परीक्षा पुढे ढकलल्याने राज्यभरातील हजारो उमेदवारांना प्रचंड दिलासा मिळाला आहे. सोशल मीडियावर उमेदवार भाजयुमो व प्रशासनाचे आभार मानत आहेत.
हा निर्णय उमेदवार-केंद्रित व लोकशाही मूल्यांना साजेसा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. भाजयुमोच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय शक्य झाल्याची भावना उमेदवारांतून व्यक्त होत आहे.
