Local Body Elections: 57 नगरपरिषदांची निवडणूक रद्द होणार?

Maharashtra Local Body Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्याप्रकरणी आता एक मोठी माहिती समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) सर्वोच्च न्यायालयासमोर (Supreme Court) ही चूक मान्य केली आहे.

मात्र, याबाबतची सुनावणी कोर्टात होण्याअगोदरच राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला असून १२ जिल्ह्यांतील नगरपालिका आणि नगरपंचायतीतील ३५ जागांवरील निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. याबाबत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघामारे यांनी माहिती दिली आहे. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, गोंदिया, जालना, लातूर, नांदेड, परभणी, पुणे, सोलापूर, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यातील ३५ जागांवरील मतदानाला स्थगिती देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना या निर्णयाची अधिकृत माहिती पाठवली आहे. ३५ जागांच्या निवडणुका अचानक का रद्द करण्यात आल्या याबाबत देखील माहिती समोर आली आहे.

कारण काय?

छाननी दरम्यान संबंधित ३५ जागांवरील उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर २५ नोव्हेंबरपर्यंत निकाल लागणे गरजेचे होते. पण तसे न झाल्याने पुढील कार्यवाही ठप्प झाली आहे. परिणामी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटपच झाले नसल्याने मतदान अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित जागांवरील २ डिसेंबर रोजी होणारे मतदान रद्द झाले आहे.