8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आनंदाची बातमी; पगार आणि पेन्शन किती वाढेल?

Pune news :: काही दिवसांआधी केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली होती. आता लवकरच याबाबत पुढील घोषणा केली जाऊ शकते. वेतन आयोगाचे मुख्य काम केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे वेतन, पेन्शन आणि भत्ते वाढवणे असून मागील वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन दर 10 वर्षांनी बदलले गेले आहेत. आजच्या आपल्या लेखात आठवा वेतन आयोग काय आहे, कधी लागू होईल, पगार किती वाढेल आणि पेन्शनधारकांना काय फायदे मिळतील, यांसारख्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

वेतन आयोग म्हणजे काय?
वेतन आयोग केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचे पगार आणि भत्ते सुधारण्यासाठी स्थापन केला जातो. आठवा वेतन आयोग केंद्र सरकारने आपल्या कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांचे वेतन आणि भत्ते यांचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेला एक नवीन वेतन आयोग आहे. महागाई वाढली की कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित बिघडते त्यामुळे, आयोग वेळेनुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनात बदल करण्याची शिफारस करतो. केंद्र सरकारचे कर्मचारी, संरक्षण दलातील जवान, PSU मधील कर्मचारी आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांना या आयोगाचा लाभ मिळतो.

भारतात वेतन आयोग दर किती वर्षांनी येतो?
साधारणपणे, दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग स्थापन केला जातो. याआधीच्या वेतन आयोगांनीही अनेक बदल केले. सातव्या वेतन आयोगाने वेतन मॅट्रिक्स आणि एकसमान फिटमेंट फॅक्टर आणला तर, आता आठव्या वेतन आयोगाकडून नवीन शिफारशींची अपेक्षा आहे

आठवा वेतन आयोग कधी लागू होईल
हा आयोग जानेवारी 2026 मध्ये लागू होऊ शकेल. “त्याची अंमलबजावणी होण्याची संभाव्य तारीख 1 जानेवारी 2026 आहे,” असे सांगितले जात आहे. म्हणजेच, 1 जानेवारी 2026 पासून कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये बदल दिसू शकतात.