pune news भारतीय जनता पार्टी हा भांडणे लावणारा पक्ष आहे. त्यामुळे कुणालाही मतदान करा; मात्र, आईशपथ सांगतो, कमळाला मतदान करू नका, असे माजी मंत्री व रासप नेते महादेव जानकर यांनी जाहीर सभेत स्पष्टच सांगितले.
सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व माजी मंत्री महादेव जानकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. महादेव जानकर यांनी अप्रत्यक्षपणे महाविकासआघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.
जत नगरपरिषद ही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. सध्याच्या निवडणुकीत प्रामुख्याने चौरंगी लढत दिसून येत आहे. सांगलीच्या जतमध्ये महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजय शिंदे व उमेदवारांच्या प्रचारासाठी एक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत महादेव जानकर यांनी हजेरी लावली. यावेळी महादेव जानकर यांनी जोरदार भाषण केले. या भाषणाद्वारे त्यांनी भाजपवर हल्लाबोल करत महाविकास आघाडीसोबत युती करत असल्याचे संकेत दिले आहेत.
कमळाला मतदान करू नका
मी त्यांच्या छावणीत राहून आलो आहे. मला त्यांची नियत आणि नीती मला चांगलीच माहिती आहे. आरक्षणाचे गाजर तुम्हाला दाखवलं जाईल. पण ते दिलं जाणार नाही. चार रस्ते केले म्हणजे झालं नाही. समाजात भांडण झाली तुमच्या भागीदारापासून बाजूला करण्याचे पाप भाजपने केले आहे. माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही कोणालाही मतदान करा. पण आई शप्पथ सांगतो, कमळाला मतदान करू नका, असे विधान महादेव जानकर यांनी केले आहे.
कारण भाजपा जाती- जातीत भांडण लावणार पक्ष आहे. आज एकनाथ शिंदे व अजित पवारांची काय अवस्था आहे. तशी अवस्था माझी झाली नाही. कारण मी या भानगडी केल्या नाहीत असा टोला देखील महादेव जानकर यांनी लगावला.
भानगडी केल्या नाहीत म्हणून मी वाचलो
भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची आज काय अवस्था केली आहे हे आपण पाहतो. तशी माझीही अवस्था करण्याचा प्रयत्न होता, मात्र, मी वाचलो कारण मी काही भानगडीच केल्या नाहीत, असे जानकर म्हणाले.
जतच्या लोकप्रतिनिधींचे हिंदूत्व ठेकेदारीसाठी – विशाल पाटील
जतच्या लोकप्रतिनिधींचे हिंदूत्व हे केवळ मंत्रीपद व ठेकेदारी मिळवण्यासाठी असल्याची टीका खासदार विशाल पाटील यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर केली. अगोदर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन यांच्याबाबत भाई-भाई म्हणणारे मुख्यमंत्र्यांना खूष करण्यासाठी हिंदूत्वनिष्ठ असल्याचा आव आणत आहेत. केवळ स्वार्थासाठी आपले गाव सोडून जतमधून उमेदवारी घेतली. जत तालुक्याचा विकास व्हावा असा यामागे उद्देश नव्हता, तर केवळ मंत्री पद आणि ठेका मिळावा यासाठी निवडणूक लढवली आणि या तालुक्याचे दुर्दैव त्यांचा विजय झाला, असा विशाल पाटील म्हणाले.
