पुणेकरांनो सावधान! नवले पुलावरून जाताना ‘ही’ चूक पडेल महागात; आजपासून नवीन नियम लागू
Pune news – पुण्यातल्या नवले ब्रिजवर सातत्याने होणाऱ्या अपघातावर प्रशासकीय यंत्रणांकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. भूमकर पूल ते नवले पूल यादरम्यान वाहनांना वेगावर मर्यादा घालाव्यात, अशा सूचना नुकत्याच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केल्या होत्या.
महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त अधिकाराचा वापर करून पोलीस उपआयुक्त (वाहतूक) हिम्मत जाधव यांनी दिलेल्या आदेशानुसार कात्रज बायपासवरील भूमकर ब्रीज ते नवले ब्रीज शेवटपर्यंतच्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी जास्तीत जास्त वेगमर्यादा ३० किमी प्रतितास अशी निश्चित करण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवांतील वाहने जसे की अग्निशमन दल, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी यांना मात्र या आदेशातून सूट देण्यात आली आहे. नवीन वेगमर्यादेची अंमलबजावणी दि. २५ नोव्हेंबरपासून करण्यात येणार असून, पूर्वी जारी करण्यात आलेले सर्व वेगमर्यादेबाबतचे आदेश रद्द करण्यात आले आहेत.
वाहनचालकांनी स्पीडोमीटर तपासून निर्धारित वेगमर्यादेचे पालन करावे, तसेच रस्त्यावरील सर्व मार्गदर्शक फलक व बोर्डिंगकडे लक्ष द्यावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास सीसीटीव्ही व स्पीड गन प्रणालीद्वारे कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
