शिवाजीराव मते पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला दिले निवेदन
पुणे :- खडकवासला परिसरातील नागरिकांची आळंदीपर्यंत थेट बससेवेची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सतीश गव्हाणे साहेब यांची भेट घेऊन या बससेवेबाबत सविस्तर चर्चा केली.
खडकवासला ते आळंदी मार्गावर शैक्षणिक संस्था, नोकरीसाठी प्रवास, धार्मिक स्थळांना भेट देणारे भाविक तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी ही बससेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. नागरिकांची वाढती गैरसोय लक्षात घेऊन गव्हाणे साहेबांनी प्रस्तावावर सकारात्मक भूमिका घेतली असून येणाऱ्या काही महिन्यांत ही बस सेवा सुरू करण्याचा विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.
या भेटीदरम्यान मनसे वाहतूक सेना शहराध्यक्ष शिवाजीराव मते पाटील, हभप राजाभाऊ भूरूक आणि बाळासाहेब मंडलिक उपस्थित होते. ह्या बससेवेचा फायदा मोठ्या प्रमाणात खडकवासला व परिसरातील रहिवाशांना होणार असल्याने या प्रयत्नाचे नागरिकांमध्ये कौतुक होत आहे.
मनसेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या महत्वाच्या सेवेला मार्ग मोकळा होत असून लवकरच प्रत्यक्ष बससेवा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
