पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले?

पाच वर्षांपूर्वी राज्यात कोरोनाची लाट आल्याने लॉकडाऊन सुरू असताना पालघरमध्ये मुले चोरणारे समजून जमावाने दोन साधूंची ठेचून हत्या केल्याने खळबळ उडाली होती. या घटनेवरून तेव्हा विरोधात असलेल्या भाजपाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती.

मात्र आता याच पालघर साधू हत्याकांडात आरोप केलेल्या एका कार्यकर्त्याला भाजपाने पक्षात घेतल्याचं वृत्त समोर आलं असून, त्यावरून भाजपावर चौफेर टीका होत आहेत. भाजपाच्या समर्थकांकडूनही पक्षाला घरचा आहेर दिला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

पालघर साधू हत्याकांडातील आरोपीच्या कथित पक्षप्रवेशाच्या दाव्यांबाबत स्पष्टीकरण देताना भाजपा नेते प्रकाश गाडे म्हणाले की,”काल पासून मॅसेज येत आहेत यावर काय उत्तर देणार? हे खरं आहे का? काल बऱ्याच जणांना यावर रिप्लाय दिला. पण, माहिती घेऊन पोस्ट करणं गरजेचं वाटलं म्हणून पोस्ट करतोय. मला बऱ्याच जणांनी विचारलं की खरं आहे का? बऱ्याच जणांना उत्तर देताना विचार केला की, माहिती घेऊन उत्तर द्यावे किंवा सत्य माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवावी, म्हणून ही पोस्ट लिहिली आहे.

या पोस्टमध्ये प्रकाश गाडे यांनी लिहिले की, सर्वप्रथम तर पालघर हत्याकांड मी, स्वतः खूप जवळून हाताळलं आहे. पालघर हत्याकांड वरून माझ्या विरोधात कम्युनिस्ट पार्टीकडून डिफेमेशन केस फाईल झाली होती. मी, त्या गावातील भाजपचे कार्यकर्त्यांशीदेखील बोललो होतो. त्यामुळं केस ही आपल्या सर्वांसाठी जिव्हाळ्याचा तेवढाच गंभीर विषय आहे. त्यामुळे या विषयी लिहताना माहिती घेऊन लिहणे गरजेचे आहे.

काल भाजपमध्ये पक्ष प्रवेश झालेले काशिनाथ चौधरी हे तिथले स्थानिक आहेत. ते आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. पालघर हत्याकांड प्रकरणात काशिनाथ चौधरी यांच्यावर कोणताही गुन्हा नोंदवला गेला नाही. ह्या प्रकरणात एकूण तीन एफआयआर दाखल आहेत, तलासरी पोलीस स्टेशन, सीआयडी आणि सीबीआय या तिन्ही एफआयआरमध्ये काशिनाथ चौधरी यांचे नाव नाही. त्याच बरोबर कोर्टात दाखल केलेल्या चार्जशीट मध्ये देखील काशिनाथ चौधरी यांचं नाव नाही, असे प्रकाश गाडे यांनी सांगितले.