1 कोटी ‘लाडक्या बहिणी’ योजनेतून बाहेर? 2.35 कोटी महिलांपैकी

Ladki Bahin Yojna: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली. यावेळी सरसकट महिलांना याचा लाभ देण्यात आला. पण यानंतर यातून लाखो अपात्र महिलांना वगळण्यात आले.

महाराष्ट्रातील 1 कोटी महिला योजनेतून बाहेर पडणार? असा प्रश्न उपस्थित होतोय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

महाराष्ट्रात सुरु असलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ सुमारे 2.35 कोटी महिलांना होतोय. त्यापैकी फक्त 1.3 कोटी महिलांनी ई-केवायसी पूर्ण केले आहे. उर्वरित जवळपास 1 कोटी महिलांचे ई-केवायसी 18 नोव्हेंबरपर्यंत बाकी आहे. महिला व बाल विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने याबद्दल माहिती दिली. गरज पडल्यास मुदत वाढवली जाईल, असेही ते म्हणाले. ही प्रक्रिया ऑनलाइन काही मिनिटांत पूर्ण होते, पण सुरुवातीला अडचणी आल्या. नंतर व्यवस्था सुरळीत झाल्याने मोठ्या संख्येने महिलांनी ती पूर्ण केल्याचे दिसून आले आहे..

फसवणुकीचे आरोप

विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या योजनेत सुरुवातीला 2.5 कोटी महिलांनी नोंदणी केली होती. मात्र काहींनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे आरोप झाले. त्यामुळे अनेक नावे काढून टाकली गेली. फसवणूक रोखण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले. ही प्रक्रिया लाभार्थींची खरी ओळख पटवते. निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशात या योजनेचा मोठा वाटा मानला जातो.