केंद्रीय निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करून निवडणुका जिंकण्याचा महाराष्ट्र पॅटर्न बिहारमध्ये दिसून आला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत मतचोरी करणाऱया भाजपच्या नेतृत्वातील एनडीएने बिहार विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 243 पैकी 202 जागांवर पाशवी बहुमत मिळवत पुन्हा एकदा सत्ता काबीज केली.
तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात लढणाऱया महाआघाडीला फक्त 35 जागा जिंकता आल्या. या निवडणुकीत सर्व अंदाज फोल ठरवत भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना मोठे यश मिळाले असले तरी जनमत आणि मतमोजणीतील तफावत यामुळे निवडणूक निकालाबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
पोटनिवडणुकीत भाजपला झटका
जम्मू-कश्मीर, राजस्थान, पंजाब, ओडिशा, झारखंड, मिजोरम आणि तेलंगणा या राज्यांतील 8 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला केवळ 2 जागा जिंकता आल्या. तेलंगणा आणि राजस्थानमध्ये कॉँग्रेसने बाजी मारली. पंजाबमध्ये आप, जम्मू-कश्मीरातील बडगाम येथे पीडीपीचा विजय झाला. झारखंडमध्ये झामूमोने बाजी मारली. मिजोरममध्ये मिजो नॅशनल फ्रंटचा उमेदवार जिंकला. जम्मू-कश्मीरमधील एक जागा आणि ओडिशा येथे भाजप उमेदवार जिंकला.
एनडीएने बिहारमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण हे जाहीर न करता जेडीयू नेते मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात निवडणुका लढविल्या, तर विरोधी पक्षात असणाऱया आरजेडी, कॉँग्रेस महाआघाडीने मुख्यमंत्री पदासाठी तेजस्वी यादव यांच्या नावाची घोषणा केली होती. विरोधकांची एकजूट आणि निवडणुकीआधीचे बिहारमधील वातावरण पाहता सत्ताविरोधी लाटेचा फायदा महाआघाडीला होईल असे चित्र सर्वत्र होते; पण भाजप आणि मित्र पक्षांच्या प्रलोभनी घोषणांना भुलून बिहारच्या जनतेने एनडीएच्या पारडय़ात भरभरून मतदान केले. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाचा फारसा प्रभाव निवडणुकीत दिसून आला नाही. जनसुराज्यमुळे एनडीला फायदा, तर महाआघाडीला मोठा फटका बसल्याचे एकंदर दिसत आहे.
2020 च्या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला काठावरचे बहुमत होते. बहुमतासाठी 122 जागांच्या मॅजिक फिगरची गरज आहे. एनडीएला 125 जागा मिळाल्या होत्या. यावेळी ही संख्या 202 जागांपर्यंत गेली आहे. गेल्यावेळी भाजपला 74 जागा होत्या. यावेळी 89 आहेत. जदयुला 42 होत्या. यावेळी तब्बल 85 जागा मिळाल्या आहेत. बिहार सरकारच्या 29 पैकी 28 मंत्री विजयी झाले. मात्र एकमेव मंत्री जदयूचे सुमित सिंह हे चकाई येथून पराभूत झाले.
मोदींचा हनुमान चिराग कामी आला
चिराग पासवान यांच्या एलजेपीने (आर) 2020च्या निवडणुकीत स्वतंत्रपणे 135 जागा लढवल्या होत्या. त्या वेळी जेडीयूच्या सर्व 115 उमेदवारांच्या विरोधात चिराग पासवान यांनी उमेदवार दिले होते. याचा मोठा फटका जेडीयूला बसला होता. स्वतःला पंतप्रधान मोदींचा हुनुमान असे संबोधणाऱया चिराग यांनी 2025मध्ये एनडीएसोबत निवडणूक लढवली याचा मोठा फायदा एनडीएला झाला. मागील वेळी गमावलेल्या 34 पैकी 21 जागा जेडीयूला जिंकता आल्या. भाजपला 8 जागांचा फायदा झाला, तर चिराग पासवान यांच्या पक्षाला 19 जागा जिंकता आल्या. मोदींचा हनुमान एनडीएच्या कामी आला.
3 लाख मतदार कसे वाढले?
माकप (एमएल) लिबरेशन पक्षाचे सरचिटणीस दिपांकर भट्टाचार्य यांनी निकालावरून जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, निकाल नैसर्गिक नाहीत. बिहारमधील जमिनीवरील वास्तवाला धरूनही नाहीत. एसआयआरनंतर बिहारमध्ये 7.42 कोटी मतदार होते. मात्र आयोगाच्या अधिकृत माहितीनुसार हा आकडा 7.45 कोटींवर जातो. हे जास्तीचे 3 लाख मतदार कुठून आले, हे निवडणूक आयोग सांगणार का, असा सवाल भट्टाचार्य यांनी केला. .
साहनी यांच्या पक्षाचा दारूण पराभव
महाआघाडीने उपमुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून व्हीआयपीच्या मुकेश साहनी यांना प्रोजेक्ट केले होते. त्यांच्या पक्षाला या निवडणुकीत 15 पैकी एकही जागा त्यांना जिंकता आली नाही.
ज्ञानेशकुमार यांना नेपाळला पाठवा! कामराने घेतली फिरकी
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा याने एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्याने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना नेपाळला पाठवा. तिथेही भाजपचे सरकार स्थापन होईल, असा टोला लगावत भाजप केंद्रीय निवडणूक आयोगाशी संगनमत करून निवडणूक जिंकत असल्याबद्दल टीका केली आहे.
निवडणूक हायजॅक – संजय सिंह
बिहारमध्ये निवडणुकीपूर्वी ‘एसआयआर’ सर्वेक्षण करण्यात आले. लाखो मतदारांची नवे वगळण्यात आली. हे सर्व भाजप आणि निवडणूक आयोगाचे कारस्थान असून निकालात ते दिसून आले. ही निवडणूक हायजॅक झालेली आहे. त्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे अभिनंदन, अशी टीका आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी केली.
एनडीएने एकता दाखविली – नितीश कुमार
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल मतदार तसेच एनडीएतील सर्व घटक पक्षांचे आभार मानले. या निवडणुकीत एनडीएने पूर्ण एकता दाखविली आणि मोठा विजय मिळविला. या विजयाबद्दल एनडीएतील सहकाऱयांचे आभार! बिहार आणखी प्रगती करेल आणि सर्वात विकसित राज्यांच्या श्रेणीत समाविष्ट होईल, असे नितीश कुमार यांनी म्हटले आहे.
‘एसआयआर’ने गेम केला, यूपीत होऊ देणार नाही – अखिलेश
बिहारमध्ये ‘एसआयआर’ने गेम केला आहे. तोच गेम पश्चिम बंगाल, तामीळनाडू, यूपी आणि इतर ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न आहे. मात्र, हा डाव उघडकीस आला असून आम्ही हा गेम यापुढे खेळू देणार नाही, असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ‘एक्स’वरील पोस्ट मध्ये म्हटले आहे.
