योगेश क्षीरसागर यांनी ऐन निवडणुकीत राजीनामा दिल्याने बीडमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्र लिहित क्षीरसागर यांनी म्हटलं की, ‘मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड विधानसभा अध्यक्षपदी काम करत होतो. परंतु वेळोवेळी स्थानिक पातळीवर पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये मला जाणीवपूर्वक डावलले जात होते. मी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या कानावर ही बाब अनेक वेळा घातलेली आहे’.
बीड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विश्वासू योगेश क्षीरसागर यांनी त्यांच्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे सोपवला आहे. निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिल्याने बीडमध्ये राष्ट्रवादीमध्ये मोठी दरी निर्माण झाली असून मोठा धक्का मानला जात आहे.
‘तक्रार केल्यानंतरही यामध्ये कोणताही बदल झालेला दिसला नाही. त्यामुळे मी माझ्या बीड विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा आपल्याकडे सुपूर्त करत आहेत. तरी पक्षाने माझ्यावर टाकलेली जबाबदारीच्या माध्यमातून मी पक्षाची विचारधारा तळागळातील कार्यकर्त्यांपर्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पोहचवण्याचा प्रयत्न केला. पक्षाने टाकलेल्या विश्वासाबदल मी सर्व वरिष्ठ नेतेमंडळीचे मनस्वी आभार मानतो, असे ते पुढे म्हणाले.
क्षीरसागर करणार भाजपमध्ये प्रवेश
अजित पवार गटाचा राजीनामा दिलेले योगेश क्षीरसागर हे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे. नगर परिषदेमध्ये आमदार विजयसिंह पंडित यांनी हस्तक्षेप केल्याने योगेश क्षीरसागर यांनी निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतंय. मंत्री पंकजा मुंडे यांचे नेतृत्वात बीड नगरपरिषदेची निवडणूक योगेश क्षीरसागर लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार गटाकडून विधानसभेची निवडणूक लढवलेले क्षीरसागर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे.
