Farmer Protest : सरकार बदल्याशिवाय तुम्हाला शांत बसू देणार नाही, महादेव जानकरांचा इशारा

नागपूरमध्ये प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा महा एल्गार चांगलाच चर्चेत आहे. अशामध्ये बुधवारी (29 ऑक्टोबर) नागपूर खंडपीठाने आंदोलन स्थळ रिकामे करण्याचे आदेश दिले, तरीही बच्चू कडू यांच्यासह इतर नेत्यांनी हे आंदोलन सुरूच ठेवले होते.

अशामध्ये पोलीस न्यायालयाची प्रत घेऊन आले तेव्हा आम्हाला तुरुंगात टाका पण शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नसल्याचे बच्चू कडू यांच्यासह इतर नेत्यांनीही स्पष्ट केले. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुरु असलेल्या या महाएल्गार आंदोलनात राष्ट्रीय समज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर हेदेखील सुरुवातीपासून उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत, तुमचा (मुंबईतील) बिस्तारा नागपूरला आणल्याशिवाय राहणार नसल्याचे म्हणत इशारा दिला आहे.

बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या नागपुरातील आंदोलनामुळे सामन्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यांनी केलेली चक्काजाममुळे नागपूरच्या चारही बाजूला वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. अशामध्ये सद्यस्थिती पाहता नागपूर खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आणि त्यांना बुधवारी 6 वाजेपर्यंत आंदोलनस्थळ रिकामे करण्यास सांगितले. अशामध्ये अंदाजे 6 वाजण्याच्या सुमारास न्यायालयाचे आदेश घेऊन पोलीस बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी पोहोचले. न्यायालयाने 6 वाजायच्या आधी आंदोलनस्थळ खाली करा असे आदेश दिले होते. त्यानंतर या महाएल्गार आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वच नेत्यांनी सरकारने मागणी मान्य केल्याशिवाय हलणार नसल्याचे सांगितले.

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले की, “सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनी केली, शेवट आम्ही (शेतकरी आंदोलनकर्ते) करू. सरकार बदल्याशिवाय आम्ही तुम्हाला शांत बसू देणार नाही,” असा इशारा शेतकरी नेते महादेव जानकर यांनी दिला आहे. “आम्ही महाराष्ट्र बंद पाडू, सरळ मार्गाने सुरु असलेल्या आंदोलन न्यायालयाच्या माध्यमातून आंदोलन पाडण्यासाठी चुकीच्या मार्गाने डाव टाकत असाल तर तुम्हाला घालवल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा कळकळीचा इशारा आहे. जनता हीच न्यायालय आहे. महाराष्ट्रातील एकदेखील तुरुंग रिकामे सोडणार नाही. आम्ही तयार असून आता सरकार हरते की आम्ही? हेच बघू,” असे म्हणत त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे