Pune News : आयुक्तांचा ‘सफाई’ दौरा! निरीक्षकासह चौघांना दणका

Pune News शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे अधिकार असलेल्या महापालिकेच्या वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षकांनाच शहर स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा करणे चांगलेच भोवले आहे.

महापालिका आयुक्तांच्या पाहणीवेळी शिवाजीनगर-घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत अस्वच्छता आढळल्यानंतर महापालिका आयुक्तांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक तसेच दोन मोकादामांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार, परिमंडळ उपायुक्त संतोष वारूळे यांनी या चारही कर्मचाऱ्यांना दंडाच्या कारवाईची नोटीस बजावली आहे. दीपबंगला चौक ते वडारवाडी रस्ता या भागात आयुक्तांनी शुक्रवारी पाहणी केल्यानंतर हे कारवाईचे आदेश दिले.महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून शहरातील सर्व प्रभागांमध्ये फिरून प्रशासनाच्या कामकाजाची माहिती घेतली जात आहे. आयुक्त प्रत्यक्ष शहरात फिरल्यानंतर क्षेत्रीय कार्यालयांकडून त्यांना दिलेली कामेच होत नसल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे मागील आठवड्यात महापालिका आयुक्तांनी नगररस्ता-वडगावशेरी तसेच हडपसर क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रमुखांसह इतर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली केली होती. त्यानंतर आता आयुक्तांनी घनकचरा विभागाच्या आरोग्य निरीक्षकांवरच कारवाईचा बडगा उभारला आहे.रविवारी महापालिका आयुक्तांनी शिवाजीनगर-घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या भागात पाहणी केली. यावेळी त्यांनी दीप बंगला चौक ते वडारवाडी रस्ता पाहिला असता या भागात स्वच्छताच झालेली नव्हती.

तसेच, स्वच्छता कर्मचारीही नव्हते. ही बाब समोर आल्यानंतर महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली. मात्र, त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे आयुक्तांनी या सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुनील कांबळे यांना ५ हजार रुपये, आरोग्य निरीक्षक संगीता बदामी यांना ४ हजार रुपये तर मोकादम ललित मकवाणी आणि राज साळवी यांना प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची नोटीस उपायुक्त वारूळे यांनी बजावली आहे.