Nilesh Ghaywal: नावाच्या स्पेलिंगमध्ये हेराफेरी मग दिला अहिल्यानगरचा पत्ता; कसा मिळाला निलेश घायवळला पासपोर्ट?

Pune news पुण्यातील कुख्यात गुंड निलेश बन्सीलाल घायवळ (Nilesh Ghaywal) याने पोलिसांना आणि प्रशासनाला गुंगारा देत बेकायदेशीररित्या पासपोर्ट मिळवला (Pune Crime) आणि विदेशात पळून गेल्याचे समोर आले आहे.

पुण्यातील गंभीर गुन्ह्यांमुळे पासपोर्ट मिळणे अवघड असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने नावात बदल करून व खोटा पत्ता दाखवून पासपोर्ट मिळवला. या धक्कादायक प्रकारामुळे पोलिस व पासपोर्ट विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

निलेश घायवळवर पुण्यात खून, दरोडे आणि गोळीबारासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पासपोर्ट मिळणार नाही हे लक्षात आल्याने त्याने डिसेंबर 2019 मध्ये पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात ‘तात्काळ’ पासपोर्टसाठी अर्ज दाखल केला. त्यासाठी त्याने आडनावातील “h” अक्षर वगळून ‘Ghaywal’ऐवजी ‘Gaywal’ असे नमूद केले. तसेच अहिल्यानगरमधील कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील “गौरी घुमट, आनंदी बाजार, माळीवाडा रोड, 414001” हा खोटा पत्ता अर्जात दाखवला.

या अर्जाची पडताळणी कोतवाली पोलिसांकडे गेली असता त्यांनी घायवळ दिलेल्या पत्त्यावर जाऊन तपास केला. मात्र तो तेथे राहत नसल्याचे स्पष्ट झाले आणि पोलिसांनी पासपोर्ट कार्यालयाला फक्त “Not available” एवढाच अहवाल पाठवला. हा निगेटिव्ह रिपोर्ट असूनही 16 जानेवारी 2020 रोजी पासपोर्ट कार्यालयाने त्याला पासपोर्ट मंजूर केला.

त्यानंतर 2021 मध्ये दरोड्याच्या गुन्ह्यात त्याला अटक करून मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. 2022 मध्ये जामीन मिळाल्यावर न्यायालयाने त्याचा पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र घायवळने पासपोर्ट जमा केला नाही आणि पोलिसांनीही तो जप्त केला नाही. हा पासपोर्ट वापरून सप्टेंबर 2023 मध्ये तो युरोप दौऱ्यावर गेला.

सध्या निलेश घायवळ 90 दिवसांच्या व्हिसावर स्वित्झर्लंडमध्ये फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. कोथरूड भागातील गोळीबार प्रकरणातही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. एवढे गंभीर गुन्हे दाखल असूनही त्याला पासपोर्ट आणि व्हिसा कसा मिळाला, याचा तपास पुणे पोलिसांनी सुरू केला आहे. त्याला पकडण्यासाठी ‘लुकआऊट’ नोटीस जारी करण्यात आली आहे.

या प्रकरणाबाबत अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी माहिती दिली की, 23 डिसेंबर 2019 रोजी पासपोर्ट पडताळणीसाठी अर्ज आला होता. पोलिसांनी चौकशी केली असता अर्जदार तेथे नसल्याचे आढळले आणि ‘Not available’ अशी नोंद पाठवण्यात आली. हा निगेटिव्ह रिपोर्ट असतानाही पासपोर्ट मंजूर कसा झाला, याची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

हा प्रकार उघड झाल्याने पोलिस, पासपोर्ट कार्यालय आणि प्रशासनातील त्रुटींचा मोठा प्रश्न पुढे आला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला निलेश घायवळ इतक्या सहजपणे विदेशात पोहोचल्याने नागरिकांमध्ये संताप पसरला आहे