Pune News छत्रपती संभाजी महाराजांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ शिल्पासमोर पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य ढोल-ताशा मानवंदना सोहळा पार पडला. हजारो शिवशंभू भक्त, शेकडो ढोल-ताशा पथकांची उपस्थिती होती.
या ऐतिहासिक क्षणाची नोंद “लंडन बुक ऑफ रेकॉर्ड”मध्ये झाली आहे.
आसमंत उजळून टाकणारे भगवा ध्वज… ढोल-ताशांचा गगनभेदी निनाद…आणि मर्दानी खेळ सादरकरणाऱ्या मावळ्यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके… आणि त्याला शिवगीत सादरकर्ते अवधुत गांधी यांच्या मावळी सुरांची साथ… शिव-शंभूभक्तांची अफाट गर्दी… आणि साक्षात वरुणराजाचा जलाभिषेक… असा ना भूतो ना भविष्यती अनुभव हजारो शिव-शंभूप्रेमी आणि पिंपरी-चिंचवडकरांनी घेतला. निमित्त होते, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वांत उंच शिल्प आणि शंभू सृष्टीला ढोल-ताशांची रोमहर्षक ऐतिहासिक मानवंदनेचे.
हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ढोल-ताशा महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकाराने ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ला ऐतिहासिक मानवंदना सोहळ्याचे आयोजन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र, मोशी येथे करण्यात आले होते. या निमित्ताने हजारो शिव-शंभू भक्तांनी या ठिकाणी तुफान गर्दी केली. विशेष म्हणजे, पावसाने जोरदार हजेरी लावलेली असतानाही हा सोहळा अक्षरश: ‘रेकॉर्ड ब्रेक’ ठरला.
शिव गीतांचे प्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी मानवंदना सादर केली. यानंतर हिंदू भूषण ट्रस्ट स्मारकाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. ”युगत मांडली…”, ”शिवरायांच्या बुद्धीयुक्तीचा लागना पारं..” , ”शिवबा राजं… शिवबा राजं…” अशा गीतांवर हजारो प्रेक्षक आणि वादकांनी ताल धरला.
ह.भ.प. संग्रामबापू भंडारे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावत शिवशंभूच्या विचारांना पुढे चालवण्यासाठी ”धर्मनिष्ठा, कर्मनिष्ठा” हेच ब्रीद ठेवून काम करणारे आमदार महेश लांडगे आहे असे सांगत “आय लव्ह यु दादा” असे म्हटले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम शिवशंभु प्रेमी, पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शिववंदना आणि ध्वज प्रणामाने सोहळ्याचा समारोप करण्यात आला. यावेळी ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ च्या आवारात जोरदार आतिषबाजी करण्यात आली.
महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता आमच्या माता-भगिनींवर अन्याय होतो. अशावेळी धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज यांना स्मरून सांगतो. ट्रस्टच्या माध्यमातून मी आणि माझे सहकारी या अन्यायाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसतील. वालचंद नगर येथे एका गतिमंद मुलीबाबत अत्याचाराचा प्रकार घडला. असा प्रकार आपल्या घरातील व्यक्तीसोबत घडला असता, तर आपण गप्प बसलो असतो का? यापुढील काळात माता-भगिनींवर कोणत्याही प्रकारचा अन्याय झाला, तर पोलिसांपर्यंत जायची ही गरज लागणार नाही महेश लांडगे आणि त्यांचे सहकारी अशा नराधमांचा चौरंग्या केल्याशिवाय राहणार नाही, असे आक्रमक भाषण हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी केले.
