बाणेर येथील मित्रनगर परिसरात फुटलेल्या ड्रेनेज पाईपलाईनच्या दुरुस्तीला प्रारंभ, ज्योती कळमकर यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे Pune News कोथरूड विधानसभा मतदारसंघातील स्मार्ट सिटी परिसरा म्हणून ओळखला जाणारा बाणेर या भागातील मित्रनगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून फुटलेल्या ड्रेनेज पाईपलाईनमुळे नाल्यात सतत दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी वाहत होते, या अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला होता पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिकच बिकट झाली होती, नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतरही समस्या मार्गी लागत नसल्याने परिसरातील रहिवासी मोठ्या गैरसोयीचा सामना करत होते.

या पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता, सदर प्रश्नाची पुणे महानगरपालिका प्रशासनाने दखल घेतली. त्यांच्या प्रयत्नांनंतर पुणे महानगरपालिकेच्या मुख्य खात्यामार्फत फुटलेल्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

या कामाच्या प्रारंभावेळी ड्रेनेज विभागाचे अनिकेत शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिक अभय बागल, स्नेहा बेलेकर, योहान साहेब, आदित्य सरपोतदार, श्री. केदारी आदी उपस्थित होते. नागरिकांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली व या तातडीच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

नागरिकांनी केले समाधान व्यक्त; कळमकर यांचे मानले आभार

परिसरातील नागरिकांनी सांगितले की, या दुरुस्तीमुळे येथील आरोग्य धोक्याची समस्या दूर होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.तसेच दुर्गंधी व अस्वच्छतेच्या त्रासातून सुटका होऊन आरोग्यदायी वातावरण निर्माण होईल.