Pune News पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती, सुचनांवर गुरुवार, उद्यापासून बालगंधर्व रंगमंदिरात सुनावणी होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या सुनावणीत तब्बल ५ हजार ९९० हरकती ऐकून घेतल्या जातील.
एवढया मोठया प्रमाणात हरकती आल्यानंतरही प्रशासनाने केवळ दोनच दिवस सुनावणी ठेवल्याने हरकतदार नाराजी व्यक्त करत आहे.महापालिका प्रशासनाने या सुनावणीचे वेळापत्रक हरकतदारांना मोबाइल तसेच इ-मेल वर पाठविले आहे.
नगरविकास विभागाच्या उपमुख्य सचिव व्ही. राधा यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून त्या हरकतींवर सुनावणी घेणार आहेत. पहिल्या दिवशी प्रभाग १ ते २९ या प्रभागांची सुनावणी होणार आहे. पालिकेच्या प्रभाग रचनेच्या अखेरच्या दिवशी तब्बल २८९९ हरकती आल्या. त्यामुळे एकूण हरकतींचा आकडा मागील पालिका निवडणुकीच्या तुलनेत यावेळी दुप्पट झाला आहे. हरकतीत सर्वाधिक २ हजार ६६ हरकती प्रभाग क्र. ३४ नर्हे- वडगाव बुद्रुक या प्रभागावर आहेत.
प्रारूप प्रभाग रचना २२ ऑगस्टला जाहीर झाली. त्यावर ४ सप्टेंबरपर्यंत हरकती घेण्याची मुदत होती. प्रभाग रचनेत मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप करून अनेक प्रभागांची मोडतोड केल्याचा आरोप झाला आहे. भाजप वगळता इतर राजकीय पक्षांकडून प्रभाग रचनेचा अभ्यास करून हरकती घेण्यात आल्या आहेत. बहुतांश हरकती या प्रभागांच्या हद्दीबाबत असून त्यावरूनच यावेळी गोंधळ होण्याची शक्यता आहे.
हरकतदारांनाच प्रवेश..
बालगंधर्व रंगमंदिरात सुनावणीसाठी फक्त हरकत घेतलेल्या नागरिकांनाच वेळापत्रकानुसार आत सोडले जाणार आहे. त्यासाठी त्यांना ओळखपत्र, महापालिकेने दिलेला मेसेज तसेच पाठविलेले पत्र दाखवूनच आत प्रवेश दिला जाणार आहे. त्यांच्या सोबत इतरांना सोडण्यात येणार नाही. या ठिकाणी मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात केला असून सभागृहाच्या आतील, बाहेरचे चित्रिकरणही केले जाणार आहे.
पहिल्या दिवशी २९ प्रभागांची सुनावणी..
-प्रभाग १ ते ६ : स. १० ते ११.३० वाजे पर्यंत
-प्रभाग ७ ते १४ ; स. ११.३० ते दुपारी १
-प्रभाग १५ ते २१ : दुपारी २.३० ते ४
-प्रभाग २२ ते २९ : सायं. ४ ते ६ पर्यंत
