पुण्यात अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’चा भाजपशी संघर्ष

pune update news महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर भाजपचा प्रभाव आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला भाजपने फार फायदा होऊ दिलेला नाही.

उलट मित्रपक्षांना आणि महाविकास आघाडीतल्या पक्षांना त्यांच्या हक्काच्या भागातील एकगठ्ठा मतदान मिळू नये, यासाठी प्रभाग वेगवेगळ्या पद्धतीने तोडले आहेत. त्यामुळे भाजपवगळता अन्य पक्षांतील इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

गेल्या सव्वातीन वर्षांपासून पुणे महापालिकेच्या निवडणुका झाल्या नसल्याने महापालिकेवर आयुक्तांचे ‘प्रशासकराज’ सुरू आहे. याच कालावधीत पायाभूत सुविधांसह प्रशासकीय पातळीवरची शिस्त कमालीची बिघडलेली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या निवडणुका कधी होणार याची वाट राजकीय पदाधिकाऱ्यांसह सामान्य नागरिक बघत आहेत. पुणे महापालिकेने प्रारूप प्रभागरचना राज्य सरकारला सादर केली. त्यानंतर नगरविकास विभागाने त्यात आवश्यक ते बदल करून राज्य निवडणूक आयोगाकडे ती सादर केली. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी पुण्यातील प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली.

यामध्ये ४० प्रभाग हे चार सदस्यांचे आहेत तर एक प्रभाग पाच सदस्यांचा आहे. अशा प्रकारे ४१ प्रभागांमधून १६५ नगरसेवक महापालिकेत निवडून द्यावे लागणार आहेत. या प्रभागरचनेवरून खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर नाराजी व्यक्त केली. आपण सुरेश कलमाडींना कसे रोखले होते, असे सांगून भाजपला सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत या दोन नेत्यांमधील आणि पक्षांमधील संघर्ष दिसून येईल.

मोहोळांवर अजितदादा नाराज

पुणे लोकसभेची पहिलीच निवडणूक लढवून खासदार झालेले व त्यानंतर लगेच केंद्रीय राज्यमंत्री मिळाल्याने पुण्यात मुरलीधर मोहोळ यांची हवा होती पण आता पुण्यातील राजकारणात त्यांचे विरोधक वाढू लागल्याने राजकीय हनिमून आता संपलेला आहे. महापालिकेची प्रभाग रचना करताना मोहोळ यांनी केवळ भाजपचाच फायदा बघितला. त्यावरून अजित पवार हे मोहोळांच्या कार्यशैलीवर नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी मोहोळ यांच्यावर टीका केली. आपल्या कार्यकर्त्यांनी लोकसभेला मोहोळ यांचे चांगल्या पद्धतीने काम केले. पण प्रभागरचना करताना आपल्याला विचारात घेतले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेचेही मोहोळ यांनी पालन केले नाही. यापूर्वी पुण्याचे खासदार म्हणून सुरेश कलमाडी यांचे महापालिकेच्या प्रभागरचनेवर लक्ष असायचे. ‘असे असतानाही आम्ही काँग्रेसचा महापौर होऊ दिलेला नव्हता,’ असे सूचक वक्तव्य पवारांनी बैठकीत केले. त्यामुळे पुणे शहरात अजित पवारांविरुद्ध मुरलीधर मोहोळ असा नवीन राजकीय संघर्षाचा अनुभव येण्याची शक्यता आहे. याचे पडसाद पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्येही उमटण्याची शक्यता आहे.

स्वबळावर लढण्याचे आदेश

भाजपने प्रारूप प्रभागरचना करताना विश्वासघात केल्याची सल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे ‘प्रभागरचना मनासारखी झाली म्हणून रडत बसू नका. महायुती होणार की नाही याचाही विचार न करता स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी सुरू करा,’ असे आदेश अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार नाही, हे स्पष्ट झालेले आहे. शिंदे यांच्या शिवसेनेने मात्र पुण्यात महायुती व्हावी यासाठी प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत. शिवसेनेच्या वाट्याला २०-३० जागा आल्या तरी ती त्यांच्यासाठी संजीवनी ठरेल, हे निश्चित.