पुण्यात टोळीयुद्ध भडकणार? वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरला पॅरोल मंजूर

Pune crime news नाना पेठेत झालेल्या हत्याकांडामुळे गुन्हेगारी वर्तुळातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने वनराजचाच भाचा आयुष गणेश कोमकर (वय 22) याचा निर्घृण खून केला.

रात्री आठच्या सुमारास लक्ष्मी कॉम्प्लेक्स परिसरात घडली. यानंतर आता वनराज आंदेकर प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकर याला आयुषच्या अंत्यसंस्कारासाठी पॅरोल मंजूर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष कोमकर हा वनराज आंदेकरच्या बहिणीचा मुलगा होता. तरीदेखील टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याने कसलीही दया न दाखवता आपल्या नातवाला जीवे मारले. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी बंडू आंदेकर याच्यासह 13 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकरसह आणखी एका महिलेचा समावेश आहे. या प्रकरणी यश पाटील आणि अमित पाटोळे या दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

दरम्यान, आयुषचे वडील गणेश कोमकर तसेच कुटुंबातील काही सदस्य सध्या तुरुंगात आहेत. आयुषच्या मृत्यूनंतर गणेश कोमकर, जयंत कोमकर आणि संजीवनी कोमकर यांनी पॅरोलची मागणी केली होती. त्यानुसार, वनराज आंदेकर प्रकरणातील प्रमुख आरोपी गणेश कोमकर याला आयुषच्या अंत्यसंस्कारासाठी पॅरोल मंजूर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

आयुषच्या खुनानंतर त्याचा मृतदेह ससून रुग्णालयात ठेवण्यात आला असून, आज संध्याकाळपर्यंत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे.