Pune News गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असताना बाणेर परिसरात ‘मुळशी पॅटर्न’च्या स्टाईलने एका तरुणावर कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गणेश मंडळासमोर हा हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाच्या रागातून चार आरोपींनी मिळून सचिन माने नावाच्या तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला आहे. हल्लेखोरांपैकी एकाने सचिनचा पाठलाग करत चार ते पाच वेळा कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. सचिन जीव वाचवण्यासाठी रस्त्याने धावत सुटला. या घटनेत सचिन जखमी झाला आहे.
बाणेर येथील गणेश मंडळाजवळ काही तरुण येथे बसले होते. त्यावेळी अचानक हा हल्ला झाला. बाणेर पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांचा सध्या शोध सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.
