मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. दक्षिण मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील गेल्या पाच दिवसांपासून उपोषण करत आहेत. पण काल मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले आहेत.
राज्य सरकार आणि उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. राज्य सरकारने एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नये, मुंबईतील आझाद मैदानातून मराठा आंदोलकांना हुसकावून लावलं तर ती सल खोलवर काळजात रुतणारी असेल, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही काहीतरी निमित्त काढून मराठ्यांना आझाद मैदानातून हुसकावून लावू नका. तुम्ही पोलिसांना सांगून आम्हाला अटक करायला लावली तर, ते घातक होईल. आमच्या मराठा आंदोलकांवर लाठी मार केला तर ते तुमच्यासाठी अतिघातक ठरेल. तुम्ही गरीब मराठ्यांच्या अपमान केला तर त्यांच्या डोक्यात बदला घेण्याची चीड निर्माण होईल, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकार आणि फडणवीस यांना दिला आहे.
तसेच, तुम्ही आम्हाला कितीही भिती घातली तरी आम्ही घाबरणार नाही, आम्ही मराठ्यांची औलाद आहोत. आम्ही शांत आहोत आम्हाला शांत राहुद्या, फडणवीस मी जे बोलतो, ते होत असंत. आणखी मराठे मुंबईत यायला सुरूवात झाली नाही. शनिवारी आणि रविवारी मराठे मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान होईल. ती वेळ येऊन देऊ नका. तुम्ही जास्तीत जास्त काय करणार? 100 पोलीस आले तरी अटक करणार आणि 1 लाख पोलीस आले तरी अटक करुन जेलात टाकणार. आम्ही तिथही उपोषण करू. पण आता सरकाला सुट्टी नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
