Pune विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघाची लढत सर्वाधिक लक्षवेधी ठरली होती. कारण बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनीच आव्हान दिले होते
युगेंद्र पवार (Yugendra Pawar) म्हणाले, मला बारामतीशिवाय दुसरीकडे बाहेर कुठे करमणार नाही. बारामती हे माझे गाव आणि घर आहे. त्या ठिकाणी मी काम करत आलो आहे आणि इथून पुढेही मी बारामतीत काम करत राहीन. पण, इथून पुढे मी अजितदादांच्या विरोधात उभं राहणार नाही.
राजकारणात काहीही घडू शकतं. शरद पवार हे राज्यसभेवर गेले, त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा रिकामी झाली. अजितदादाही (Ajit Pawar) उद्या एखाद्या वेळी दुसरा निर्णय घेऊ शकतील. दुसरीकडून…. (युगेंद्र पवार यांनी हे वाक्य अर्धवट उच्चारले). पण, मला अजितदादांबाबत काही बोलायचे नाही, असे सांगून युगेंद्र पवार यांनी त्याबाबत अधिक बोलणं टाळले.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमच्या कुटुंबात जे काही झालं, ते मला वैयक्तिक अजिबात आवडलं नव्हतं. आताही मला ते आवडत नाही. ते कुठंतरी थांबलं पाहिजे, असं माझं मत आहे. शेवटी हे कुटुंब आहे, सगळ्यांनी मोठ्या कष्टातून हे उभे केलेले आहे. त्यामुळे आता कुठंतरी थांबलं पाहिजे. पण मी माझं काम करत राहीन, लोकांमध्ये जात राहीन. जेव्हा लोक मला लायक समजतील, तेव्हा शंभर टक्के लोक मला तिथून निवडून देतील, असा विश्वासही युगेंद्र पवार यांनी बोलून दाखवला.
